जळगाव लाईव्ह न्यूज । ६ डिसेंबर २०२५ । जळगावसह राज्यात गारठा कायम असला तरी अनेक ठिकाणी किमान तापमानात चढ उतार सुरु आहे. जळगाव शहरात गेल्या तीन दिवसांपासनू किमान तापमान १२.६ अंशावर स्थिरावले असले तरी कमाल तापमानात एक अंशाने घट होऊन शुक्रवारी शहरातील पारा २७.८ अंशावर आला होता. सध्या रात्री आणि सकाळच्या वेळेस हुडहुडी भरणारी थंडी जाणवत असून पुढील दोन दिवसांत राज्याच्या किमान तापमानात हळूहळू घट होत पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी धुळे येथे राज्यातील नीचांकी ८.६ अंश तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात पारा १० अंशांच्या पुढे होता. जळगाव शहरासह जिल्ह्यात मागच्या आठवड्यात थंडी कमी होती मात्र या आठवड्यात थंडी वाढलेली पाहायला मिळते आहे. थंडीचा जोर अधिकच वाढल्यामुळे आता नागरिक उबदार कपड्यांचा आणि शेकोट्यांचा आधार घेत आहे.

जळगाव शहरात तापमान १२.६ अंशावर

जळगाव शहरात डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला शीतलहरीप्रमाणे -स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासनू किमान तापमान १२.६ अंशावर स्थिरावले आहे. तर कमाल तापमानात एक अंशाने घट होऊन शुक्रवारी शहरातील पारा २७.८ अंशावर आला होता. पुढील २ दिवसात थंडीची लाट जोर धरण्याची शक्यता आहे. किमान तापमान ९ अंशांपर्यंत घसरू शकते. या काळात कमाल तापमान २६ अंशांपर्यंत राहील. रेडिएटिव्ह फॉग व उत्तर भारतातील थंड हवेच्या प्रवाहामुळे थंडी तीव्र होईल. सकाळी धुके वाढून दृश्यमानता ४०० मीटरांपर्यंत खाली येऊ शकते असा अंदाज हवामान अभ्यासक यांनी वर्तवला.




