जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात किमान तापमान १० अंशापर्यंत घसरले होते. यामुळे गुलाबी थंडीचा अनुभव जळगावकरांना घेता आला. मात्र बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे जळगावसह राज्यात थंडी गायब झाली आहे. मागील दोन-तीन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने थंडी कमी झाली असून किमान तापमानात मोठी वाढ झाली.
या ढगाळ वातावरणाचा फटका रब्बी हंगामातील पिकांना देखील बसताना दिसत आहे. पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ‘रब्बी’चा हंगाम संकटात सापडण्याची भीती आहे. धास्तावलेले शेतकरी पीक वाचविण्यासाठी औषधांची फवारणी करत असून औषध फवारणीचा खर्च वाढल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.
यंदा हुडहुडी भरविणारी थंडी मागील आठवड्यात काही दिवस होती. या आठवड्यात ढगाळ वातावरणाची समस्या वाढली आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तर पुढील चार-पाच दिवस वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. किमान तापमानातही वाढ झाली आहे. विषम वातावरणाचा रब्बी, वेलवर्गीय व फळ पिकांनाही फटका बसत आहे.
या पिकांना फटका
कांदा : सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे गेली. तर अनेक शेतकऱ्यांनी महागाचे कांद्याचे बी आणूनही पावसामुळे गेले. या परिसरातील कांद्यावर ढगाळ वातावरणाचा परिणाम होऊन करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे.
हरभरा : थंडी गायब झाल्यामुळे पेरलेल्या हरबरा पिकाची वाढ खुंटत असून, अळीचा प्रादुर्भाव होत आहे.
करडई : करडईवर या वातावरणात ‘मावा’ रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. त्याचा फटका उत्पादनाला बसतो.
गहू : गव्हाच्या परिपक्चेतसाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. ढगाळ वातावरणात ‘मावा’ रोगाला पोषक वातावरण निर्माण होते. त्यामुळे गव्हावर दुहेरी संकट येते.
ज्वारी : ढगाळ वातावरणात ज्वारीच्या शेंड्यामध्ये कीडीचा प्रादुर्भाव होतो. ‘शेंडामर’ हा रोग त्याचाच भाग. त्यामुळे ज्वारीच्या दाण्यांचे पुरेसे पोषण होत नाही.
पिकांवर रोगराईचे संकट
रब्बी पिकांच्या वाढीला फटका बसला आहे. दादर ज्वारी, संकरित ज्वारी, हरभरा, मका आदी पिकांसाठी थंडी आवश्यक आहे. विषम वातावरणामुळे वेलवर्गीय पिकांसह मका, केळी पिकात फवारणी घेऊन बुरशीजन्य व अन्य कीटकांची समस्या दूर करावी लागत आहे. यात खर्च व अतिरिक्त श्रम लागत आहेत. तसेच उत्पादनावरही परिणाम होत आहे. थंडीमुळे केळी पिकात करपा रोगाची समस्या आली होती. मध्येच ढगाळ वातावरण तयार झाल्याने बुरशीजन्य रोगही केळीत फोफावू लागले आहेत. यामुळे खते, पाण्यासंबंधीचे काटेकोर नियोजन शेतकऱ्यांना करावे लागत आहे. मध्येच ढगाळ वातावरण तयार होत आहे.