जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२१ । राज्यात 11 वी प्रवेशसाठी होणारी सीईटी अर्थात प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आल्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला. यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांच्याच आधारे केले जावेत, असे निर्देश हायकोर्टाने दिले.
यंदा दहावीची परीक्षा कोविड-१९ विषाणू संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन आणि नववी, दहावीच्या गुणांच्या आधारे मूल्यांकन करून निकाल लावण्यात आला. त्यामुळे अकरावी प्रवेशांसाठी सीईटी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यासंदर्भात राज्य सरकारने 28 मे रोजी एक अध्यादेश काढला होता.
तो अध्यादेश हायकोर्टाने रद्द केला आहे. या संदर्भात हायकोर्टाने राज्य सरकारला निर्देश दिला आहे की, अकरावीमध्ये प्रवेश हा दहावीत मिळालेल्या गुणानुसारच करण्यात यावा. राज्य सरकार तर्फे निकालाला स्थगिती देण्याची केलेली मागणीही हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.