जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२५ । राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून यामुळे अशातच जळगावमधील चोपड्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आलीय. २२ वर्षीय एका नराधम तरुणाने पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार चोपड्यातील गोरगावले शिवारात घडल्याने खळबळ उडाली आहे.

हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी सदर संशयित तरुणाला बेदम चोप देत चोपडा पोलिसांच्या हवाली केले आहे. या घटनेत संशयित आरोपीला बेदम चोप देण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चोपडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. मयाल गिरदार वास्कले (वय 22, रा. पिपऱ्यापानी ग्रामपंचायत, चिलऱ्या ता. वरला, मध्यप्रदेश) असं संशयित आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात चोपडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मध्यप्रदेशातील आरोपी मयाल गिरदार वास्कले याने चोपडा गोरगावले रस्त्यावरील एका झोपडीमध्ये पाच वर्षीय मुलीला कुरकुरे घेऊन देतो या बहाण्याने नेत तिच्यावर अतीप्रसंग केला. मुलीने आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी तात्काळ झोपडीकडे धाव घेतली. सदर संशयित तरुणाला बेदम चोप देत त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पोलिस अधिकारी मधुकर सावळे, एकनाथ भिसे, जितेन्द्र वल्टे, पो.कॉ. संतोष पारधी यांनी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे