---Advertisement---
चोपडा गुन्हे

धानोऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट : पोलीस विरुद्ध ग्रामस्थ आल्याने तणाव, दगडफेक

---Advertisement---

Chopda News । जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । चोपडा तालुक्यातील धानोरा येथे रविवारी गणेशोत्सव मिरवणूक शांततेत सुरू असतांना रात्री १० वाजता सपोनि किरण दांडगे यांनी वाद्य बंद करण्याच्या सूचना मंडळांना केल्या. तीनच मंडळ राहिले असल्याने काही वेळ देण्याची विनंती गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली. सपोनि दांडगे यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने कार्यकर्त्यांनी जागेवरच ठिय्या मांडण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्ते व पोलिसात वाद होऊन कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. घटनेने संपूर्ण गावात धावपळ उडाली. विसर्जन मिरवणुक शांततेत सुरू असून सुद्धा पोलिसांकडून दबंगगिरी केली गेल्याचा आरोप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, वाद वाढल्यावर ग्रामस्थ आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बचावासाठी दगडफेक केल्याचे समजते.

dhanora ganapati

याबाबत सविस्तर असे की, धानोरा ता.चोपडा येथे गणपतीची विसर्जन मिरवणूक पाचव्या दिवशी म्हणजेच दि.४ रोजी दुपारी २ वाजता शांततेत सुरु झाली होती. मिरवणूक सुरू असताना पोलिसांकडून वारंवार गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना सूचना करण्यात येत होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण दांडगे यांनी गणेश मंडळाच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस गाडीत देखील बसवले होते. यामुळे ग्रामस्थांमध्ये पोलिसांप्रती प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती. रात्री दहा वाजता मिरवणुक ही मशिद जवळुन जात असतांना दोन मंडळ पार झाली होती. तिसरे मंडळ ओम गणेश मंडळ जात असतांना वाद्य बंद करा असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या सुचनेने गणेशभक्त नाराज झाले. यावेळी काही गणेशमंडळांनी जागेवरच ठिय्या मांडला.

---Advertisement---

गणेश मंडळ पुढे जात नसल्याने सपोनि दांडगे व मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. वाद वाढल्याने पोलिसांनी लाठी चार्ज सुरू केला. यात मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना देखील यामुळे इजा झाली. अचानक झालेल्या प्रकारामुळे संपूर्ण गावात एकच पळापळ झाली व सर्वत्र अशांतता पसरली. परिस्थिती गंभीर होत असल्याने कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनीही पोलिसांवर तुफान दगडफेक केली. यामुळे पोलिसांनी रात्री साडेदहा वाजता गावातून काढता पाय घेतला. घटनेत काही गणेशभक्त जखमी झाले असून दोन फोर व्हिलर आणि काही दुचाकींचे नुकसान झाले आहे.

गणेश मंडळांनी श्रींच्या मुर्त्या जागेवरच ठेवत सपोनि किरण दांडगे यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत विसर्जन होणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. गावातील हनुमान मंदिर चौकात सध्या मोठा जमाव जमला आहे.

दरम्यान, पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने ९ लोक जखमी झाले असून त्यात २ बालकांचा समावेश असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. रात्री १२ वाजेच्या सुमारास १०८ रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. महसूलचे एक अधिकारी आणि एक पंचायत समिती सदस्य ग्रामस्थांची समजूत घालत असून पोलीस अधिक्षकांशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---