जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२१ । हृदय पिटाळून लावणारी एक घटना नुकतेच समोर आली आहे. संपत्ती आपल्या नावावर करून देण्यासाठी पोटच्या मुलाने आणि सुनेने मारहाण केल्याचा प्रकार गेल्या महिन्यात घडला होता. पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्याने आई-वडिलांना मंदिरात झोपून रात्र काढण्याची वेळ आली आहे. पीडित आई-वडिलांनी जिल्हाधिकारी, सहाय्यक पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन देखील त्याचा काही फायदा झाला नसल्यानेच ही वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.
लिलाबाई सोनवणे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, जळगाव तालुक्यातील भोकर येथे रमेश सोनवणे हे पत्नी लीलाबाई आणि एक मुलगी व नातवंडांसह राहतात. रमेश सोनवणे यांचा मुलगा दीपक सोनवणे याची पत्नी सिमा ही बऱ्याच वर्षांनी पुन्हा पतीकडे राहण्यास आली असल्याने मुलगा दीपक हा ते सांगेल ते सर्व ऐकत असतो. काही महिन्यांपूर्वी सिमा ही माहेरून भोकर येथे आली आणि दीपकसह मागील खोलीत राहू लागली. दिनांक ७ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास दीपक आणि त्याच्या पत्नीने आई-वडिलांची प्रॉपर्टी स्वतःच्या नावे करून घ्यावी अशी मागणी वडिलांकडे केली.
वडील नकार देत असल्याने त्यांनी वडिलांना शिवीगाळ देखील केला. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सीमा सोनवणे देखील आल्या होत्या. आवाज वाढल्याने दीपक सोनवणे यांची लहान बहीण भांडण सोडवण्यासाठी पुढे आली. सीमा सोनवणे यांनी लहान हातावर विळ्याने वार केले. दीपक सोनवणे यांनी केस ओढून तिला शिवीगाळ केली. तसेच त्यांना घरातून बाहेर हाकलून दिले. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्याने दोघांची हिम्मत वाढली असून त्यांच्याकडून आमच्या जिवाला धोका असल्याचे निवेदन लीलाबाई सोनवणे जिल्हाधिकारी, सहाय्यक पोलीस अधिक्षकांना दिले होते. पोलिसांनी आणि प्रशासनाने दखल न घेतल्याने मुलगा व सुनेने घराला कुलुपे लावून घेतली असून रमेश सोनवणे व लिलाबाई यांना मंदिरात झोपून रात्र घालवावी लागली आहे.