जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२४ । यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक या गावात एका बंद घराची जीर्ण झालेली भिंत कोसळली, त्यात भिंतीजवळ खेळत असलेला ७ वर्षीय बालक दाबला गेला. ही दुर्घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजता घडली. बालकाला यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. राजरत्न सुपडू बाहे (वय ७) असं मृत बालकाचे नाव आहे.
सांगवी बुद्रुक (ता.यावल) या गावात प्रमोद उल्हास सोनवणे यांचे बंद घर आहे. या घराची भिंत पावसामुळे जीर्ण झाली आहे, या भिंतीजवळच राजरत्न सुपडू बाहे (वय ७) हे बालक खेळत होते. पावणेसहा वाजता अचानक भिंत कोसळली. या भिंतीखाली हा बालक दाबला गेला. हा प्रकार निदर्शनास येताच नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली.
बालकास यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करत बालकास मृत घोषित केले. बालक भिंतीखाली येऊन दगावल्याची बातमी कळताच कुटुंबीयांनी रूग्णालयात धाव घेत आक्रोश केला. अन्य नागरिकांनीही हळहळ व्यक्त केली. मृत बालक सुपडू मोहन बाडे यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता.