जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराने हैराण झालेल्या राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. तो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पेट्रोल डिझेल दरात कपात केली आहे. त्यानुसार पेट्रोल 5 रुपयाची तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची कपात करण्यात आली आहे. आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, या निर्णयावर राज्य सरकारच्या तिजोरीवर सहा हजार कोटी रुपयाचा बोजा पडेल.
गेल्या काही महिन्यात पेट्रोल डिझेलचे दर भरमसाठ वाढले होते. पेट्रोल १२२ रुपयावर गेलं होते तर डिझेल १०५ रुपयांपर्यंत पोहोचले होते. यामुळे महागाईने कळस गाठला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने इंधनाच्या दरात कपात केली होती. याप्रसंगी पंतप्रधानांनी राज्य शासनालाही असे करण्याचे आवाहन केले होते. मात्र राज्य सरकारने कर कमी केले नव्हते.
परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यता इंधनावरील दर कमी करण्यात येतील अशी घोषणा केली होती. या निर्णयाला मंत्रीमंडळाच्या बैठकीत पारीत होणे गरजेचे होते. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आली. याबाबतची माहिती आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, जळगावमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर ११२. १९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर ९७.३४ रुपये इतका आहे. आता मुख्यमंत्री यांच्या इंधन दर कपातीच्या घोषणेनंतर पेट्रोल १०७.१९ रुपयांवर येईल. तर डिझेल ९४.३४ रुपयांवर येणार. या दर कपातीच्या निर्णयानंतर वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.