जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२५ । महाराष्ट्रातील हवामानात (Weather) अनेक बदल पाहायला मिळाले. फेब्रुवारीच्या (February) सुरुवातीपासूनच राज्यातील अनेक ठिकाणी थंडी (Cold Weather) गायब होऊन तापमानात वाढ झाल्याचं दिसून आले. सध्या जळगावसह (Jalgaon) राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३५ अंशावर गेला आहे. यामुळे उष्ण झळा आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले. राज्यात येत्या काही दिवसात उन्हाचा चटका (Temperature Today) कायम राहणार असल्याचं सांगण्यात आलंय.

दरम्यान यातच हवामान खात्याने राज्यातील काही भागात पावसाचा इशारा दिला आहे. इशान्य भारतात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून 23 आणि 24 फेब्रुवारीला दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक भागात हलक्या पावसाच्या सरी हजेरी लावतील असं प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितलंय.
तर उर्वरित ठिकाणी हवामान कोरडे व शुष्क राहणार असून येत्या 2 दिवसात हळूहळू तापमानवाढ होणार असल्याचं सांगण्यात आलंय. पुढील काही दिवस राज्यात तापमानाचा पारा वाढलेला राहणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. मात्र, उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवस किमान तापमान 1 ते 2 अंशांनी घटेल आणि त्यानंतर ते हळूहळू 2 ते 3 अंशांनी वाढेल. विदर्भात कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल होणार नाही.
जळगावात आज कसं राहणार तापमान?
जळगावमध्ये गेल्या काही दिवसापासून तापमानाने ३४ शीगाठली असून उन्हाचे चटके जाणवत आहेत. सकाळपासूनच उन्हाचा तडाखा अस्वस्थ करतोय. मार्च महिन्यापासून तापमानात आणखी वाढ होणार आहे. दरम्यान शुक्रवारी जळगावचे कमाल तापमान ३४.५ अंशावर होते तर किमान तापमान १२ अंशावर होते. तर आज २२ फेब्रुवारीला आकाश दिवसभर निरभ्र राहील. कमाल तापमानात एक अंशाने वाढ होऊ शकते. वाऱ्याचा वेग ताशी १० ते १५ किमी राहील. जळगावात सध्या कुठलाही पावसाचा अंदाज नसल्याने शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.