जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय घडामोडीला वेग आला आहे. तसेच अर्ज करण्याच्या प्रक्रियेला देखील वेग आला आहे. दरम्यान, जळगाव महापालिका प्रभागनिहाय मतदार यादीच्या कार्यक्रमात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून आता ३ जानेवारी २०२६ रोजी केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. यापूर्वी ही यादी २७ डिसेंबर रोजी जाहीर होणार होती.

२७ डिसेंबर ही तारीख आता दुबार मतदारयादीचे कंट्रोल चार्ट अपलोड करण्यासाठी अंतिम मुदत म्हणून निश्चित करण्यात आली आहे. अर्ज भरल्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय रंगत वाढणार असून, २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.

उमेदवारांना दि. ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. त्याच दिवशी निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्या अंतिम उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल. मतमोजणी १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून सुरू होईल. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची सांगता १९ जानेवारी रोजी शासन राजपत्रात अधिकृत निकाल प्रसिद्ध करून केली जाणार आहे.






