वाहनधारकांनो..! शिवमहापुराण कथेमुळे वाहतूक मार्गत बदल, कथास्थळी जाण्यासाठी हे आहेत पर्यायी मार्ग
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२३ । जळगाव शहरापासून (Jalgaon City) साडेआठ किलोमीटर अंतरावर वडनगर फाटा येथे बडे जटाधारी महादेव मंदिर ट्रस्टतर्फे शिवमहापुराण कथा (Shiva Mahapuran) आज म्हणजेच ५ ते ११ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले असून कथावाचक पंडीत प्रदीप मिश्रा यांचे सोमवारी रात्री जळगावात आगमन झाले. या कथेसाठी ५ लाख चौरस फूट आकारात मंडप उभारण्यात आला असून सुमारे पाच लाख भाविक येतील असा अंदाज आहे.
दरम्यान, शिव महापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर कथा स्थळासह या भागाकडे येणाऱ्या व जाणाऱ्या मार्गावर वाहतूक वाढणार असल्याने गैरसोय टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. तशी अधिसूचना पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढली. या अधिसूचनेनुसार जळगाव शहरातील मारुती चौकपासून खेडी, आव्हाणे फाटा, वडनगरी फाट्याकडे जाणारी व येणारी वाहतूक ५ ते ११ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहे.
कथास्थळासह मार्गावर तसेच परिसरात पोलिस प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. कथास्थळासमोर व्हीआयपी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच्या बाजूला कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या वाहनांचे वाहनतळ राहणार आहे. या परिसरात पोलिस नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कथास्थळी जाणाऱ्या मार्गावर जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर पार्कंगची व्यवस्था करण्यात आली आहे त्याठिकाणाहून कथा स्थाचे अंतर हे साधारण दीड ते दोन किलोमिटर पर्यंतचे आहे. त्यामुळे भाविकांना हे अंतर पायीच पार करावे लागणार आहे.
दुचाकी, कार, हलक्या वाहनांसाठी
दुचाकी, कार, हलक्या वाहनांना टॉवर चौक, शिवाजीनगर, ममुराबाद रोडमार्गे विदगाव, रिधूर, अमोदा खुर्द मार्गे भोकरकडे जाता येईल. तसेच टॉवर चौकातून दुसरा मार्ग म्हणजे भिलपुरा, लेंडी नाला ममुराबाद रोडमार्गे विदगाव, रिधूर, अमोदा खुर्द मार्गे भोकरकडे जाता येईल.
अवजड वाहनांना पर्यायी मार्ग
अवजड वाहनांना शिवाजीनगर उड्डाणपुलावरून बंदी राहणार असून त्यांना गुजराल पेट्रोलपंप, सुरत रेल्वे गेट, दूध फेडरेशन, शिवाजीनगर, ममुराबाद रोडमार्गे विदगाव, रिधूर, अमोदा खुर्द मार्गे भोकरकडे जाता येईल.
शिवाजीनगरकडून या भागातील भाविकांना जाता येणार
जळगावातील शिवाजीनगर उड्डाणपुलावरून आव्हाना फाटा, खेडी फाटा या मार्गे भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, पहूर, धुळे या भागातील भाविकांना कथास्थळी जाता येणार आहे. या मार्गावर चार ठिकाणी वाहनतळ असून आव्हाणे फाट्याच्या अलीकडे दुचाकी व तीनचाकी वाहने उभी करता येतील, तसेच फाट्याच्या पुढे बस, टेम्पों व त्याच्या बाजूला कार उभ्या करता येतील. याशिवाय खेडी फाट्यानजीक कारसाठी चौथी पार्किंग असेल.
चोपड्याकडून पर्याय
चोपड्याकडून येणाऱ्या मार्गावर कथास्थळाकडे येताना डाव्या बाजूला चार पार्किंग असून सुरुवातीला दोन ठिकाणी कार त्यानंतर बस, टेम्पो व शेवटी दुचाकी व तीनचाकी वाहने उभी करता येतील. याशिवाय या रस्त्याच्या उजव्या बाजूला पार्किंगसाठी तीन ठिकाणी जागा राखीव ठेवली आहे.
तरसोद फाट्याकडूनही पर्याय
तरसोद फाट्यावरून बायपासकडून ममुराबादमार्गे कथास्थळी पोहोचता येणार आहे. यासाठी या मार्गावर तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरुवातीला बस, टेम्पो उभे राहतील. त्यानंतर पुढे कार आणि त्यानंतर पुढे दुचाकी आणि तीनचाकी वाहने उभी करता येतील.