जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । आठवड्याच्या विश्रांतीनंतर राज्यातील काही भागात पुन्हा २९ नोव्हेंबर आणि १ डिसेंबर दरम्यान मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. या अवकाळी पावसाचा जळगाव जिल्ह्यात देखील फटका बसण्याची शक्यता आहे. १ डिसेंबरला जळगाव जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
ज्येष्ट हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी या संदर्भातील ट्विट केलं आहे. त्यात कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सोमवारी आणि मंगळवारी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी…
हवामान विभागानं सोमवारी 29 नोव्हेंबरसाठी रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी केला आहे. तर, १ डिसेंबर ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, नाशिक आणि अहमदगर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी केला आहे. तर, सोमवारी यलो अॅलर्ट देण्यात आला नसला तरी ठाणे, मुंबई आणि सोलापूर जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मंगळवारी सोलापूर, औरंगाबाद आणि पालघर जिल्ह्यात देखील पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान गेल्या आठवड्यात राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यात जळगाव जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाने झोडपून लावले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे काहीशा प्रमाणत नुकसान झाले होते. परंतु आठवड्याच्या विश्रांती नंतर राज्यात पुन्हा पावसाचं संकट निर्माण झालं आहे.
राज्यातील तापमान वाढलं, थंडी गायब
अंदमानच्या समुद्रात गेल्या आठवडय़ात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला. सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन हलकी थंडी गायब झाली आणि आकाश अंशत: ढगाळ झाले आहे. या काळात कोकणात काही भागांत पाऊस झाला. त्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यामुळे पावसाळी स्थिती दूर झाली नाही.