जळगाव जिल्हा

जळगावात अवकाळी पावसाची शक्यता, जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसह नागरिकांना केलं ‘हे’ आवाहन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । अरबी समुद्रात लक्षद्वीपमध्ये येत्या 24 तासांत कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता व बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) क्षेत्रात भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच 2 डिसेंबर, 2021 पर्यंत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिक, शेतकऱ्यांनी सतर्क राहात सुरक्षितस्थळी थांबावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

हवामान विभागाने राज्यातील विविध ठिकाणी आजपासून पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यात जळगाव जिल्ह्याचा देखील समावेश आहे. जिल्ह्यात सकाळपासूनच आकाशात ढग दाटून येत आहे. सायंकाळी जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, आज जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.  त्यामुळे जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व तापी नदीमधील पाण्याच्या पातळीत वाढ होवून हातनूर धरणाच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील शेतकरी व नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे. शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा.

बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल, तर अशा शेतमालाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. अवकाळी पावसादरम्यान विजा, गारा व अतिवृष्टीपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. प्रसंगी मोकळे मैदान, झाडाखाली, वीजवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मर जवळ थांबू नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून राज्यावर अवकाळी पावसाचं संकट घोघावत आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीपमध्ये येत्या 24 तासांत कमी दाबाच्या क्षेत्र तयार झाल्याने पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. यामुळे कोकण व मुंबईसह राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्येसुद्धा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज या जिल्ह्याना इशारा 

आज मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

उद्या या जिल्ह्याना इशारा 

औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद येथे बुधवारी एक डिसेंबरला आणि औरंगाबाद, जालना, बीड येथे तुरळक ठिकाणी दोन डिसेंबरला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजा; तसेच जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button