जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२२ । जून महिन्यात उघडीप दिल्यानंतर राज्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळाले. दरम्यान, राज्यात काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. सध्या परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातवरण तयार झालं असून अशातच आज राज्यातील विविध भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच डिसेंबर महिन्यापर्यंत उत्तर महाराष्ट्रात अधून मधून अवकाळी पावसाचे संकट राहणार आहे.
आज या भागांना पावसाचा अलर्ट?
पाच ते दहा ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मात्र त्याआधी राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. आज विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आल्यामुळे नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, यंदा ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यात उत्तर महाराष्ट्रात अधून-मधून अवकाळी पावसाचे संकट राहणार आहे. हवामान खात्याच्या दीर्घकालीन अंदाजानुसार अवकाळी कोसल्यास त्याचा खरीप पिकांना फटका बसेल. देशभरात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान होऊनही परतीच्या प्रवासात वेग नसलेला मान्सून रेंगाळला आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात उत्तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र आता हवामान खात्याने वर्तविलेल्या अवकाळी पावसाची शक्यता शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी असणार.