शेतकऱ्यांनो शेतमालाची काळजी घ्या..! साेमवारपासून ४ दिवस अवकाळीचे संकट, जळगावातही पावसाची शक्यता
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२३ । राज्यात वारंवार होणाऱ्या हवामान बदलांमुळे आधीच शेतकरी संकटात आहे. अशात आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या साेमवारपासून पुढील ४ दिवस अवकाळी पावसाचे सावट राहणार आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही शेतमालाची काळजी घेण्याच्या सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
एकीकडे राज्यात उन्हाचा पारा वाढत आहे तर दुसरीकडे काही ठिकाणी अवकाळी पावसाचे सावट आहे. महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या मध्यप्रदेशमध्ये चक्राकार वाऱ्यामुळे हे परिणाम समोर येत आहे.
येत्या सोमवारपासून राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १६ व १७ मार्चला संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
विशेष खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील १३ ते १६ मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामध्ये जळगाव, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, परभणी छत्रपती संभाजीनगर भागात पावसाची शक्यता आहे. तर १५ ते १६ मार्च दरम्यान नागपूर, सातारा, लातूर, गोंदिया, सांगली, लातूर, धाराशिव, हिंगोली, बुलडाण्यात पावसाची चिन्ह आहे. तसेच वाऱ्याचा वेगही ३० ते ४० किलोमीटर प्रतितास असण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने वर्तविला आहे.