⁠ 
शनिवार, जून 22, 2024

…तर गुलाबराव देवकरांना उमेदवारी मिळणेच कठीण?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२४ । राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘मला गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे मी अजित पवारांसोबत कसा जाणार?’, असे म्हणत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी स्वतःचं शरद पवारांसोबतच्या त्यांच्या एकनिष्ठतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तशात लोकसभेची निवडणूक शिवसेना ठाकरे गटाने जळगाव ग्रामीण मतदार संघात एकहाती लढवल्यामुळे त्यांचे मनोबल कमालीचे उंचावले आहे. पक्षातील विश्वासर्हता आणि ठाकरे गटाची आक्रमता बघता देवकरांना उमेदवारी मिळणे कठीण, असल्याचे बोलले जात आहे.

जळगाव ग्रामीण मतदार संघ विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. गतवेळी भाजपने ऐनवेळी अपक्ष उमेदवाराला पाठबळ देऊन देखील त्यांनी चांगल्या मताधिक्क्याने निवडणूक जिंकली होती. तर राष्ट्रवादीचा उमेदवार तर थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता. अगदी धरणगाव नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील राष्ट्रवादी कोमात असल्यागत स्थिती आहे. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यामुळे आधीच राष्ट्रवादी समोर संकटांचा डोंगर आहे. दुसरीकडे ठाकरे गटाने मात्र पक्षात फुट पडूनही संघटना जिवंत ठेवण्यात बऱ्यापैकी यश मिळवले आहे.

ठाकरे गटाच्या तुलनेत राष्ट्रवादी शरद पवार गट मात्र, फार शांत आहे. अगदी संघटना खिळखिळी झाली आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. अशा परिस्थितीत ठाकरे गट जळगाव ग्रामीणवरील दावा सोडणार का?, हा मोठा प्रश्न आहे. कारण राज्यातील महाविकास आघाडीतील फॉर्म्युलानुसार जळगाव ग्रामीणची जागा ही शिवसेना ठाकरे गटाला सुटण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे देवकरांना उमेदवारी मिळणेच कठीण असल्याची चर्चा आहे.

एकीकडे जळगाव ग्रामीणमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षात फुट पडल्यापासून खूप संघर्ष केला. सतत सरकारविरुद्ध आंदोलने केली. या काळात गुलाबराव देवकर किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट हा पूर्णपणे अलिप्त राहिला. थोडक्यात शेत कसणारे वेगेळे आणि पिकावर दावा दुसरं कुणीतरी सांगणार?, हे ठाकरे गट स्वीकारेल का?, हा एक मोठा गहन प्रश्न आहे. मतदार संघाच्या बांधणी करतांना ठाकरे गट जीवाचे रान करीत आहे. अगदी सांगायचं झालं तर ठाकरे गटाकडून सुरेशनाना चौधरी, गुलाबराव वाघ, निलेश चौधरी, लक्ष्मण पाटील हे विधानसभेचे दावेदार आहेत. ठाकरे गटाचा क्लेम असतांना देवकरांना उमेदवारी कशी मिळणार?, याचीच एक चर्चा सुरु आहे.

राम मंदिराच्या प्रतिस्थापनेच्या वेळी गुलाबराव देवकर यांचे सुपुत्र विशाल देवकर यांनी माध्यमांना दिलेली जाहिरात खूप चर्चेत आली होती. अगदी देवकर परिवारातील कुणीतरी भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा देखील सुरु झाल्या होत्या. तशात २०२० मधील विधानसभा निवडणुकीच्या काळात पडद्याआड एक मोठी घडामोड घडली होती. त्या काळातही देवकर भाजपसोबत जातील का?, अशा चर्चांना उधाण आले होते. अर्थात देवकरांनी यावर कधीही उघड भाष्य केले नाहीय. तशात राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘मला गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे मी अजित पवारांसोबत कसा जाणार?’, असे म्हटले होते. त्यामुळे देवकर हे शरद पवार यांच्यावरील निष्ठा म्हणून पक्षात थांबले की, निवडणूक लढण्यासाठी?, अशी चर्चा देखील तेव्हापासूनच सुरु झाली होती.

अगदी घरकुल घोटाळ्यात सुप्रीम कोर्टात पुन्हा कुणी गेल्यास देवकर यांना निवडणूक लढण्यासाठी पुन्हा एकदा कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल का?, असाही एक प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहू शकतो. गुलाबराव देवकर यांच्यासमोरील अडचणींचा डोंगर आणि महाविकास आघाडीसह पक्षातील स्थिती बघता त्यांना उमेदवारी मिळणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आतापासूनच मतदार संघ पिंजून काढला आहे. विविध योजना, शेत रस्ते, विकास कामांच्या माध्यमातून त्यांनी मतदारांसोबत थेट संपर्क निर्माण केला आहे. दुसरीकडे कधी नव्हे ते भाजप एकदिलाने गुलाबराव पाटील यांच्यापाठीशी उभी असल्याचे चित्र आहे. लोकसभेत शिवसेना शिंदे गटाने प्रामाणिकपणे काम केल्यानंतर भाजपही गुलाबराव पाटील यांच्यासाठी तेवढीच मेहनत घेणार असल्याचे पदाधिकारी आता उघडपणे बोलत आहे. त्यामुळे गतवेळेच्या तुलनेत यंदाची निवडणूक गुलाबराव पाटील यांच्यासाठी सुकर ठरेल, असाही राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.