जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२५ । चाळीसगाव तालुक्यातील वाघले येथील ४२ वर्षीय गणेश ताराचंद राठोड यांचे अपहरण करून ४५ लाखांची खंडणी मागितली होती. मात्र चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अपहरण करणाऱ्या टोळीचा डाव हाणून पाडला. पोलीसांनी अवघ्या १२ तासांतअपहृत व्यक्तीची सुटका केली असून या टोळीतील दोन जणांच्या मुसक्या आवळल्या असून उर्वरित आरोपींचाही शोध सुरू आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ३० एप्रिल रोजी गणेश राठोड यांचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले. व्हिडीओ आणि कॉलच्या माध्यमातून मुलाकडे खंडणीची मागणी करण्यात आली होती. आरोपींनी त्यांना कुठून पळवले हे सुरुवातीला स्पष्ट नव्हते. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी जयेश दत्तात्रय शिंदे (रा. सैनिक कॉलनी, चाळीसगाव) आणि श्रावण पुंडलिक भागोरे (रा. नांदगाव, जि. नाशिक) यांचा तपास काढला.
पोलिसांनी मनमाड रेल्वे स्टेशनजवळ मोटारसायकलवरून जात असलेल्या दोघांचा पाठलाग केला. पोलिसांचे वाहन पाहताक्षणी आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तब्बल पाच किलोमीटरच्या पाठलागानंतर संशयितांना पकडण्यात आले. चौकशीत त्यांनी गणेश राठोड यांचे अपहरण हे जनार्दन उर्फ राजू पाटील (रा. डोंबिवली) आणि सोनू भाऊ (रा. मुंबई) यांच्या सांगण्यावरून केल्याचे कबूल केले आहे.
गणेश राठोड यांना चाळीसगाव तालुक्यातील पाटणा गावाजवळील एका शेतातील शेडमध्ये ठेवून मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना लासलगावजवळील जंगलात सोडून आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी जंगलातून राठोड यांना जखमी अवस्थेत शोधून त्यांची सुटका केली आणि दोघा आरोपींसह त्यांना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली बबन आव्हाड, शेखर डोमोळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.