पोलिसांच्या पथकाला चकवा : दोन घरे फोडली, चोरटे सीसीटीव्हीत कैद
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२२ । कासोद्यात गस्तीवर असलेल्या पोलिसांना चकवा देत चोरट्यांनी दोन घरे आणि बियर बार फोडल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. तसेच स्वामी समर्थ केंद्रातूनही ३० हजारांची रोकड चोरांनी लंपास केली. यात एकूण ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरांनी लांबवला. असून दोन ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे चित्रित झाले आहेत. विशेष म्हणजे कासोदा पोलिसांचे पथक गस्तीवर असूनही चोरांनी आपला हेतू साध्य केला.
दि.५ व ६ रोजी मध्यरात्री १ ते पहाटे ४ या काळात येथील स्वामी समर्थ केंद्रात साहित्य विक्रीतून आलेले १५ हजार रुपये, तर दानपेटीतील अंदाजे १५ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. तर तेथून जवळच असलेल्या हाॅटेल कृष्णा कॉटेज या बिअरबारचे पुढील शटर वाकवून घुसलेल्या चोरट्यांना रिकाम्या हाती जावे लागले. विश्रामनगर येथील विलास पाटील हे कुटुंबासह पुढील खोलीत झोपलेले होते. चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाची कडी तोडून, घरात बियाणे खरेदीसाठी ठेवलेले १० हजार रुपये कपाटातून लांबवले. पहाटे विलास पाटील हे पाणी पिण्यासाठी उठले असता त्यांना चोरीचा प्रकार समजला. याच भागातील समाधान पाटील यांच्या वडिलांना बाहेरगावी दवाखान्यात शस्त्रक्रियेसाठी दाखल केले आहे. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. घराचे कुलूप तोडून चोरांनी कपाटातील २५ हजारांची रक्कम तसेच ७ ग्रॅमची २१ हजार किंमतीची पोत लांबवली.
चोरांनी लपवले चेहरे : स्वामी समर्थ केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. ते चोरट्यांच्या लक्षात आल्याने चोरट्यांनी बाहेर ठेवलेला सूचना फलक डोक्यावर धरून चेहरे लपवल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले.
हे देखील वाचा :