जळगाव लाईव्ह न्यूज | 31 जानेवारी 2024 | उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. देशवासीयांच्या नजरा या अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पापूर्वीच मोबाईल फोनबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
आता मोबाईल फोन स्वस्त होणार आहे. अंतरिम अर्थसंकल्पाआधी केंद्र सरकारने मोठी घोषणा करत जनतेला मोठा दिलासा दिला आहे. भारत सरकारने मोबाईल फोनच्या (Smart Phone) उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या प्रमुख घटकांवर आयात शुल्क (Import Duty) कमी केलं आहे. 1 फेब्रुवारीला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प 2024 (Budget 2024) जाहीर होणार आहे, त्याआधीच सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिला दिला आहे.
मोबाईल फोनच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क (Import Duty) 15 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे. मोबाईल फोनसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्कात पाच टक्क्यांची घट करण्यात आली आहे. याचा परिणाम मोबाईल फोनच्या किमतीवरही पाहायला मिळणार असून, येत्या काळात मोबाईल फोन स्वस्त होण्याची शक्यता आहे.