जळगाव लाईव्ह न्यूज । जामनेरचे माजी नगरसेवक अनिलकुमार बोहरा यांच्यावर तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पहूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तो तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?
बोहरा यांनी प्लॉटिंगच्या नावाखाली फसवणूक केल्याची तक्रार वाकोद येथील पंढरी उर्फ संजय गणपत चौधरी यांनी दिली आहे. बोहरा यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. बोहरा यांनी वाकोद येथे एका शेतकऱ्याच्या शेतात प्लॉटिंगची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार तात्पुरता आदेशही बोहरा यांना मिळाला होता. त्यानुसार बोहरा यांनी काही ग्राहकांशी व्यवहार केला व त्यांच्याकडून काही रक्कमही घेतली. मात्र दिलेली नाहरकत सदस्यांना मान्य नसल्याचे पत्र ग्रामपंचायतीने प्रांताधिकाऱ्यांना दिल्याने तात्पुरता अकृषक आदेश रद्द करण्यात आला आहे. अकृषक आदेश रद्द झाला असला तरी बोहरा यांनी आगाऊ म्हणून घेतलेली ७० ग्राहकांची दोन कोटी ९१ लाख, ३० हजार रुपयांची घेतलेली रक्कम परत केली नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फक्त दोघांकडूनच घेतला अॅडव्हान्स वाकोद ग्रामपंचायतीने दिलेल्या ना हरकत दाखल्यावरून प्रांताधिकाऱ्यांनी तात्पुरता बिनशेती आदेश दिला होता. दरम्यान दोन ग्राहकांची व्यवहार करून काही रक्कम अॅडव्हान्स म्हणून घेतली. मात्र अकृषक आदेश रद्द करताच अॅडव्हान्स घेतलेल्या एका ग्राहकाची रक्कम परत केली तर दुसऱ्यांनाही परत करण्याचा शब्द दिलेला असून तो त्यांनाही मान्य होता. त्यामुळे फसवणूक केल्याचे आरोप तथ्यहीन असल्याचे अनिल बोहरा यांचा मुलगा अनुप बोहरा यांनी सांगितले.









