जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरात असलेल्या खळे प्लॉटवरील बांधकामवरून वाद झाला होता. वादात एका महिलेला शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली दि.२७ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी महिलेने न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शनिपेठपोलिसात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुने जळगावातील एका परिसरात असलेल्या खळे प्लॉटवर महिलेकडून कायदेशीररित्या बांधकाम केले जात होते. यावेळी दि.२७ जुलै रोजी त्या परिसरात राहणाऱ्या चौघांनी बांधकामास अडथळा निर्माण करण्यास सुरुवात केली. महिलेने त्यांना दस्ताऐवज दाखविले. मात्र तरी देखील बांधकाम करण्यास मज्जाव करीत साहीत्याची नासधूस केली. महिलेचा भाऊ हा समजूत काढण्यासाठी त्याठिकाणी आला असता, त्याला चौघांनी शिवीगाळ करीत मारहाण केली.
महिला भावाला चौघांच्या तावडीतून सोडवित असतांना त्या चौघांनी महिलेसोबत अश्लिल वर्तन करीत तिचा विनयभंग केला होता. दरम्यान, महिला तक्रार देण्यासाठी पोलिसात गेल्या मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. महिलेने तक्रार दिल्यानंतर केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे महिलेने तक्रारीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चार जणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहेत.