जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२४ । जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व माध्यमिक शिक्षणधिकारी कार्यालय, जि.प. जळगाव व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ६ व ७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ०३.०० वाजेपर्यंत करिअर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या करिअर मेळाव्यात पहिल्या दिवशी तज्ञांमार्फत विद्यार्थी व पालकांना करिअर समुपदेशन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ज्यात ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी निवडी, क्षमता, व्यक्तीमत्व, याबाबत जाणीव निर्माण करण्यासंदर्भात समुपदेशकामार्फत समुपदेशन करण्यात येणार आहे. तर दुस-या दिवशी जिल्हयातील नियाक्तांमार्फत व्यवसाय नियुक्ती संदर्भात विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे आयोजन व प्रत्यक्ष स्थळी नियुक्ती पत्र देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या करिअर मेळाव्याचे आयोजन जळगाव येथील अॅड. बबन बाहेती, ज्यू. कॉलेज, रोझलँड इंग्लिश स्कूल शेजारी, ख्वॉजामिया दर्गा चौक या ठिकाणी करण्यात आले आहे. या मेळाव्याअंतर्गत उद्योजक त्यांच्या कडील रिक्त पदाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन इ. १२ वी उत्तीर्ण होणारे व १८ वर्ष वय पूर्ण होणा-या विद्यार्थ्यांस नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतात. त्यामुळे इच्छूक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी असून इ.९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी या करिअर मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.