जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२१ । भरधाव कारने मालवाहू रिक्षेला पाठीमागून धडक दिल्याने मालदाभाडी येथील तरुण चालकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी जळगाव तालुक्यातील उमाळा ते चिंचोली दरम्यान घडलीय. तर एक जण जखमी झाला आहे. भरत उखा ढोकणे (वय ३४, रा. मालदाभाडी, ता. जामनेर) असे मृत चालकाचे नाव आहे. तर सुनील अभिमन्यू शार्दूल (वय ३०, रा. जामनेर) हा जखमीचे नाव आहे.

दरम्यान, अपघातानंतर जखमीने कारची किल्ली हिसकावून घेतली असता, कारमधील तरुणांनी त्यास मारहाण केली. मात्र, जमाव जमा हाेताच मारहाणीच्या भितीने चौघांनी कार सोडून घटनास्थळावरुन पळ काढला.
याबाबत असे कि, मालदाभाडी येथील रहिवासी भरत ढोकणे हा तरुण काही दिवसांपासून जामनेर येथे भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होता. गुरुवारी भरत याचा जामनेर येथील फर्नीचरचे काम करणारा मित्र सुनील शार्दूल हा फर्निचरचे साहित्य घेण्यासाठी जळगावला आला होता. एमआयडीसीतून साहित्य घेतल्यानंतर ते जामनेरला घेवून जाण्यासाठी सुनीलने भरतला फोन केला. भरतच्या मालवाहू रिक्षात सामान भरल्यानंतर दोघेही जामनेरकडे जात होते. या दरम्यान चिंचोलीजवळ भरधाव कारने (एम. एच. १९. ए. पी. ४६९६) भरतच्या रिक्षेला पाठीमागून धडक दिली.
त्यात तीनवेळा रिक्षा पलटी झाली. चालक भरत हा रिक्षाच्या बाहेर फेकला जावून त्याचा जागीच मृत्यू झाला तर सुनील हा जखमी झाला. सुनीलने त्याच्या मोबाइलवरुन अपघाताची माहिती त्याच्या जळगावातील नातेवाइकांना दिली. तोपर्यंत इतर वाहनधारकांनी दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. भरत यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर कारचालक व कारमधील तरुण पसार होण्याच्या तयारीत होते. यादरम्यान सुनीलने कारची चाबी व नंबरप्लेट काढून पाेलिसांना घटनेची माहिती दिली.