जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२३ । उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या १८ जुन, २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशा पालन) संपुर्ण राज्यात कार्यान्वीत झालेली आहे. या उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुंतवणुक, शासनाच्या हमीभावाने खरेदी, छंद व विशेष प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत. योजनेतील प्रमुख घटक आणि त्यांची पात्रता पुढीलप्रमाणे आहे.
वैयक्तिक मधपाळ योजेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदार साक्षर असावा, स्वताची शेती असल्यास प्राधान्य, वय १८ वर्षापेक्षा जास्त व १० दिवसाचे प्रशिक्षण अनिवार्य आहे. १० मधपेट्याचे मधपेट्या व इतर साहित्य घेणे अनिवार्य आहे.
केंद्रचालक प्रगतिशिल मधपाळ योजनेत सहभागी होण्यासाठी व्यक्ति किमान १० वी पास, वय वर्ष २१ पेक्षा जास्त, अशा व्यक्तिच्या किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याहि व्यक्तीच्या नावे किमान १ एकर शेती, जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन लाभार्थीकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत नागरिकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. यासाठी २० दिवसाचे प्रशिक्षण अनिवार्य असून १० मधपेटया व इतर साहित्य घेणे अनिवार्य आहे.
केंद्रचालक संस्था योजनेत सहभागी होण्यासाठी संस्था नंदणीकृत असावी, संस्थेच्या नांवे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान एक हजार चौरस फुट सुयोग्य इमारत असावी. शास्त्रीय पद्धतीने आग्या मध संकलन प्रशिक्षणात पारंपारिक आग्या मध संकलन करणाऱ्या कारागिरांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. छंद व विशेष प्रशिक्षणासाठी शेतकरी, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक, शासकिय सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांना सहभागी होता येईल.
अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, आयटीआय जवळ, जळगाव मोबाईल क्र. ९६२३५७८७४० अथवा संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला नं. ५, मु.पो. ता. महाबळेश्वर, जि. सातारा ४१२८०६, दूरध्वनी-०२९६८ २६०२६४ येथे संपर्क साधावा. असे जळगाव जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.