जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२१ । चाळीसगाव शहरातील जय बाबाजी चौकातील चामुंडा माता मंदिराच्यामागे राहणाऱ्या अग्रवाल परिवाराच्या घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून दागिने आणि रोकडसह साधारण ७ लाख ३७ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

कपिल दुर्गाप्रसाद अग्रवाल यांच्या या घरात चोरी झाली आहे. बुधवारी (२३ जून) ते सकाळी पत्नी, आई आणि मुलांसह अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे नातेवाईकाकडे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. विवाह सोहळा आटोपल्यानंतर कुटुंब आज शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास परत आले. त्यांना बेडरूममधील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला.
यात कपाटातील दागिने आणि यातील रोकड रक्कम लंपास झाल्याचे आढळून आले. त्यांनी सामान तपासून पाहिले असता, सोन्याचे दागिने आणि रोख साडेचार लाख रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेल्याचे त्यांना दिसून आले.
अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातून सुमारे ७ लाख ३७ हजार पाचशे रूपयांची लुट केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी कपिल अग्रवाल यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.