दहशतवाद्यांशी लढताना चोपड्यातील बीएसएफ जवान शहीद
जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२४ । बांगलादेशाच्या सीमेवर त्रिपुरा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चोपड्यातील ४२ वर्षीय बीएसएफ जवान शहीद झाले. अरुण दिलीप बडगुजर असे शहीद जवानाचे नाव असून साईबाबा कॉलनीमधील रहिवासी आहे. चोपड्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी अरुण दिलीप बडगुजर यांना वीरमरण आल्याची माहिती कुटुंबियांना दिली. यानंतर आई- वडील, पत्नी, मुलांनी एकच हंबरडा फोडला. यामुळे बडगुजर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अरुण बडगुजर हे गेल्या २० वर्षांपासून १०५ बीएसएफ बटालियन (सी टी /जीडी )मध्ये कार्यरत होते. ते चार महिन्यांनी निवृत्त होणार होते. सोमवारी दुपारच्या सुमारास भारत -बांगलादेश सीमेवर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले, अशी माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली. अरुण बडगुजर यांचे पार्थिव आगरताळा येथून इंदौर विमानतळावर ११ सप्टेंबर रोजी ०.२५ वाजता पोहोचेल. तेथून बीएसएफच्या वाहनाने मूळ गावी आणले जाणार आहे. अरुण दिलीप बडगुजर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यंसस्कार होणार आहेत.
अरुण बडगुजर यांनी जम्मू, पंजाब, ओडिसा, कोलकाता आणि त्रिपुरा आदी ठिकाणी देशसेवा केली आहे. दरम्यान, मागील तीन महिन्यात खान्देशातील तीन जवानांना वीरमरण आले आहे. अरुण बडगुजर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.