जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील चुंचाळे शिवारात मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील ३२ वर्षीय महिलेला तिच्या प्रियकराने विहिरीत ढकलून पलायन केले होते. सुदैवाने महिला बचावली. यानंतर तिने दिलेल्या माहितीनुसार यावल पोलिसांनी २४ तासांच्या आत संशयिताला मध्य प्रदेशातून शिताफीने ताब्यात घेतले. महिलेस विहिरीत ढकलून दिल्यावर संशयित सांगोळा (ता. ब-हाणपूर) येथे रेड्यांची शर्यत पाहत होता. यावेळी त्याच्या हातात बेड्या पडल्या.
उमा रविकांत चमखाने (वय ३२ रा. मोठा बालाजी मंदिर, माजनपेठ, बहऱ्हाणपूर) या महिलेस तिचा प्रियकर सलमान तडवी (रा. पातोंडा, ता. लालबाग) हा रविवारी मनुदेवी दर्शनासाठी घेऊन आला होता. मनुदेवी येथून परत जाताना ते दोघे चुंचाळे (ता. यावल) शिवारात प्रकाश जैन यांच्या शेतात थांबले. तेथे सलमानने विहिरीत डोकावत असताना उमाला विहिरीत ढकलून देत पलायन केले होते. सोमवारी सकाळी या महिलेस विहिरीतून बाहेर काढण्यात आले. तिच्या फिर्यादीवरून यावल पोलिसांत सलमानविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
यांनतर संशयिताचा शोध घेताना पोलिस बऱ्हाणपूर पोहोचले. तो ज्या हॉटेलमध्ये तो कामाला होता तेथून त्याचा पत्ता मिळवला. घर गाठले. मात्र सलमान घरी नव्हता. यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाइल क्रमांक मिळवला. तांत्रिक मदतीने त्याचे लोकेशन शोधून काढले. तो सांगोळा येथे रेड्यांची टक्कर पाहत होता. याठिकाणी असलेल्या गर्दीतून यावल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावल येथील न्यायालयात हजर केले असताना त्याला १ फेब्रुवारीपर्यंत (५ दिवस) पोलिस कोठडी सुनावली. तपास यावल येथील पोलिस उपनिरिक्षक पाराजी वाघमोडे करत आहेत. महिलेवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, सलमानची सहा महिन्यांपूर्वी उमा चमखाने हिच्यासोबत हॉटेलमध्ये ओळख झाली. यानंतर दोघे प्रेमात पडले. दोघे विवाहित असले तरी सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, उमा हिने तूतुझ्या बायकोला सोड. मी सुद्धा माझ्या नवऱ्याला सोडते. आपण लग्न करू असा तगादा लागला. सलमानसोबत वाद घातले. तिचा कायमचा काटा काढण्यासाठी विहिरीत ढकलल्याची माहिती सलमानने पोलिसांना दिली.