मुंबईच्या सुरक्षिततेसाठी भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न

जानेवारी 13, 2026 2:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने गेल्या काही दशकांत दहशतवादाचा आणि रक्तपाताचा भीषण काळ अनुभवला आहे. मात्र, २०१४ नंतर केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाने राबवलेल्या ‘दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स या धोरणामुळे मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेत आमूलाग्र बदल झाला आहे. एकेकाळी बॉम्बस्फोटांच्या दहशतीखाली जगणारे हे शहर आज भाजपच्या ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेतून सुरक्षिततेचे नवे कवच परिधान करत ‘भयमुक्त’ वाटचालीकडे प्रस्थान करत असल्याचे चित्र दिसत आहे.

zero tolerance pattern 1

२०१४ पूर्वीच्या मुंबईचा इतिहास पाहिल्यास लोकल ट्रेनमधील साखळी स्फोट, झव्हेरी बाजारातील हल्ले आणि २६/११ चा विदारक दहशतवादी हल्ला अशा जखमा या शहराच्या अंगावर आजही कायम आहेत. तत्कालीन सरकारांच्या ‘मवाळ’ धोरणांमुळे दहशतवादी घटकांचे मनोबल उंचावले होते आणि गुप्तचर यंत्रणांच्या अपयशामुळे मुंबईची सुरक्षा ‘रामभरोसे’ होती, असा थेट आरोप भाजपकडून सातत्याने केला जातो. मात्र, सत्तेत आल्यापासून भाजपने केवळ अत्याधुनिक सीसीटीव्ही नेटवर्कच उभारले नाही, तर सागरी सुरक्षेलाही प्राधान्य देऊन शहराचा सुरक्षा कणा मजबूत केला आहे.

Advertisements

मुंबईच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध घुसखोरांविरुद्ध भाजपने घेतलेली आक्रमक भूमिका हा या धोरणाचा महत्त्वाचा भाग ठरला आहे. शहराचा लोकसंख्येचा समतोल बिघडवणाऱ्या आणि गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या अवैध बांगलादेशी व रोहिंग्यांविरुद्ध मोहीम उघडून भाजपने प्रशासकीय बळाचा प्रभावी वापर केला. विशेषतः अतिक्रमणांच्या नावाखाली चालणाऱ्या देशविरोधी कारवायांना चाप लावण्याचे धाडस महायुती सरकारने दाखवले आहे.

Advertisements

या सुरक्षा धोरणातील सर्वात निर्णायक व ऐतिहासिक वळण म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफजल खानच्या कबरीभोवतीचे अनधिकृत बांधकाम हटवणे. अनेक वर्षांपासून न्यायालयीन आदेश असतानाही ‘व्होट बँक’ गमावण्याच्या भीतीने तत्कालीन सत्ताधारी ज्या कारवाईपासून पळ काढत होते, ती कारवाई नोव्हेंबर २०२२ मध्ये महायुती सरकारने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, हा संदेश यातून स्पष्टपणे देण्यात आला. हीच कठोरता मीरा-भाईंदरमधील दंगलखोरांविरुद्ध राबवलेल्या ‘बुलडोझर’ कारवाईत आणि माहिमच्या समुद्रातील अनधिकृत ‘मजार’ हटवतानाही दिसून आली.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाविकास आघाडीच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) हे पक्ष विशिष्ट समुदायाचे तुष्टीकरण करण्यासाठी आणि आपली मतपेढी जपण्यासाठी कट्टरपंथीयांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, असा दावा भाजपने केला आहे. सुरक्षा यंत्रणांनी कारवाई केल्यास ‘मानवाधिकाराचा’ मुद्दा उपस्थित करून सुरक्षा दलांचे खच्चीकरण केले जाते, असा आरोप करत भाजपने मुंबईकरांना सावध केले आहे.

आज मुंबईतील सण-उत्सव शांततेत पार पडत असून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला सीमेवरच रोखल्याचा सकारात्मक परिणाम मुंबईच्या रस्त्यांवर दिसत आहे. “गुन्हेगाराला धर्म नसतो, पण गुन्हेगारीला थारा देणे हा राष्ट्रद्रोह आहे,” या ठाम भूमिकेमुळे आजचा सामान्य मुंबईकर निर्धास्त झाला आहे. आगामी काळात मुंबईची सुरक्षा कोणाच्या हाती असेल हा निवडणुकीचा विषय असला, तरी भाजपच्या आक्रमक ‘ॲक्शन मोड’मुळे मुंबईला एक नवे सुरक्षा कवच मिळाले आहे, ही वस्तुस्थिती अधोरेखित होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now