⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

मोठी बातमी ! भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२४ । भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा राज्यसभा अध्यक्षांनी स्वीकारला आहे. जेपी नड्डा यांनी हिमाचल प्रदेशच्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

गेल्या महिन्यात गुजरातमधून वरिष्ठ सभागृहात बिनविरोध निवडून आल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज सोमवारी हिमाचल प्रदेशच्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. ते 57 राज्यसभा सदस्यांपैकी एक होते, ज्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत होता.नियमांनुसार, एखाद्या सदस्याने एका जागेवरून खासदार असताना दुसऱ्या जागेवरून निवडणूक जिंकल्यास, त्याला १४ दिवसांच्या आत त्या जागेचा राजीनामा द्यावा लागतो.

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नुकतीच लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत १९५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत पहिले नाव आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे, ते उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय अमित शहा यांना गुजरातच्या गांधी नगर मतदारसंघातून आणि राजनाथ सिंह यांना लखनऊमधून तिकीट देण्यात आले आहे. भाजप उमेदवारांची दुसरी यादी ६ मार्चला जाहीर करू शकते, असे मानले जात आहे. खरे तर लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारांची नावे जाहीर केल्याने भाजपला निवडणुकीच्या तयारीला वेळ मिळाला आहे.