जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२१ । राज्यात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आपले अपयश लपवण्यासाठी कोरोनाची चाचणी असेल, मृतांचा आकडा अशा सर्वच बाबतीत लपवाछपवी चालली आहे, अशा शब्दांत भाजप नेते माजीमंत्री गिरीश महाजन यांनी टीका करत राज्य शासनाला लक्ष्य केले.
आज दि. २६ एप्रिल रोजी आ. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन कोरोनाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली. यानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
गिरीश महाजन पुढे म्हणाले की, शासनाच्या नाकर्तेपणामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्यात वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, तरीही शासन हा विषय गांभीर्याने घेत नाही. शासनाच्या अपयशामुळेच आपण ज्यांचा जीव वाचवू शकतो, अशा लोकांचाही मृत्यू होत असल्याचा गंभीर आरोप महाजनांनी केला.लोकांनी आता करावे तरी काय..?ग्रामीण भागातील भीषण परिस्थितीकडेही गिरीश महाजन यांनी लक्ष वेधले. राज्यात कोरोनामुळे खूपच वाईट परिस्थिती आहे. विशेष करून ग्रामीण भागातील परिस्थिती विदारक आहे. रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा सर्वत्र तुटवडा आहे. रुग्णालयांना रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी रेमडेसिवीर व ऑक्सिजन मिळत आहे.
रुग्णांना बेड मिळत नाही. कोरोना चाचणीचे अहवाल 12 ते 14 दिवस येत नाहीत. हे सारे चित्र गंभीर आहे. असे सांगत ते पुढे म्हणाले, जळगाव जिल्ह्यात आता तापमान वाढले आहे. अशा स्थितीत ग्रामीण रुग्णालये, आरोग्य केंद्रांमध्ये विजेचा प्रश्न आहे. रुग्णांसाठी पंखे नाहीत. शासनाने जनरेटर पाठवले, पण ते इन्स्टॉल झालेले नाहीत. आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या प्रत्यक्षात खूप मोठी आहे. ही सारी परिस्थिती लक्षात घेऊन अजूनही शासनाने उपाययोजना करायला हव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी आ. महाजन यांनी राज्य सरकार हे वसुलीबाज असल्याची टीका केली. ते म्हणाले की, एखादा जबाबदार अधिकारी हा थेट गृहमंत्र्यांवर आरोप करत असल्याची बाब ही अतिशय गंभीर आहे. यामुळे हे सरकार वसुलीचे काम करत असल्याचा आराप आ. महाजन यांनी याप्रसंगी केला.