जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२४ । राज्यातील विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून यानंतर राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीमधील जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. यानुसार भाजप जवळपास १६० जागांवर निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात भाजपच्या दोन जागा कमी झाल्या आहेत. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाची एक जागा वाढली आहे.
जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या ११ मतदारसंघांच्या जागावाटपाबाबत एकीकडे महाविकास आघाडीत अजून निश्चिती होऊ शकलेली नाही. तर दुसरीकडे महायुतीने जिल्ह्यातील या ११ जागांवरील फॉर्म्युला जवळपास निश्चित आल्याचं सांगितलं जात आहे. या फॉर्म्युलानुसार जिल्ह्यातील ११ जागांपैकी भाजप व शिंदेसेनेच्या वाट्याला प्रत्येकी पाच तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक जागा मिळणार आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या नावांची यादी दोन ते तीन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.
भाजपच्या दोन जागा कमी?
खरंतर २०१९ निवडणुकीत भाजप व शिवसेनेची युती होती. त्यावेळी जिल्ह्यात भाजपने ७ जागा तर शिवसेनेने ४ जागा लढविल्या होत्या. मात्र सध्या महायुमध्ये तीन पक्ष आहे. भाजपला अमळनेर व मुक्ताईनगरची जागा सोडावी लागत आहे. तर यंदा शिंदेसेनेच्या वाट्याला ५ जागा आल्या आहे. मुक्ताईनगरात सद्यस्थितीत अपक्ष आमदार असून त्यांनी शिदेसेनेला समर्थन दिल्यामुळे ही जागा शिदेसेनेच्या खात्यात गेली आहे. त्यामुळे १९९० नंतर पहिल्यांदाच या मतदारसंघात भाजपचा उमेदवार राहणार नसल्याचे सध्याच्या जागावाटपावरून दिसत आहे.तर अमळनेरमध्ये विद्यमान आमदार हे अजित पवार गटाचे असल्यामुळे ही जागा भाजपला मित्र पक्षाला सोडावी लागली आहे. यामुळे इथे देखील १९९५ नंतर पहिल्यांदाच भाजपचा उमेदवार राहणार नाही, असे दिसते.
असे ठरलेय जागा वाटप
शिवसेना : जळगाव ग्रामीण, चोपडा, मुक्ताईनगर, पाचोरा, एरंडोल
भाजप: जामनेर, चाळीसगाव, जळगाव शहर, रावेर, भुसावळ
अजित पवार गट : अमळनेर