जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२४ । राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पार पडणार असून याच दरम्यान, भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या भाजप प्रभारीपदी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जून रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी महायुतीतून शिवसेना शिंदे गटाकडून किशोर दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीतून अजित पवार गटाने महेंद्र भावसार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यामुळे महायुतीत बिघाडी झाली असून भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन यांची पक्षाकडून प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या पाठीशी भाजपची ताकद लागणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत उमेदवार दिल्याने महायुतीत आधीच मिठाचा खडा पडला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र भावसार, ठाकरे गटाचे संदिप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याशी करावा लागणार सामना करवा लागणार आहे. आता मंत्री गिरीश महाजन नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काय करिष्मा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.