जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२२ । कोरोना काळ आणि राज्यातील एकंदरीत असलेल्या परिस्थितीमुळे यंदाच्या प्रशासकीय बदल्या रखडल्या होत्या. बदल्यांना स्थगिती देण्यात आली असली तरी काही प्रमाणात बदल्या होत होत्या. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (IAS Abhijit Raut) आणि पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे (IPS Pravin Mundhe) दोघांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून गणेशोत्सव आटोपताच दोघांची बदली होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्याचा कार्यभार दोघांनी योग्य पद्धतीने हाताळला असून जिल्हावासियांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. After goodbye to Bappa, the transfer of Collector, Superintendent of Police
राज्यातील बहुतांश अधिकाऱ्यांची पदोन्नती, नियमीत बदल्या यंदा रखडल्या आहेत. अगोदरचा कोरोना काळ आणि नुकतेच राज्यात झालेले सत्तांतर यामुळे बदलीचे सर्वच गणित कोलमडले आहे. जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या देखील शासनाच्या आदेशामुळे रखडल्या आहेत. बदल्या रखडल्याने अनेकांचे नियोजन चुकले तर कितीतरी अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत एकाच ठिकाणी थांबून आहेत. जळगावात देखील अनेक अधिकाऱ्यांची पदोन्नती होणार आहे, त्यात सहाय्यक अधीक्षकांसह पोलीस निरीक्षकांचा देखील समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्याप्रमाणात फैलाव झालेला असताना कोरोना रुग्ण मृत्यू दर देशात सर्वाधिक होता. जिल्ह्याची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना जिल्हाधिकारी म्हणून अभिजीत राऊत यांनी तर पोलीस अधीक्षक म्हणून डॉ.प्रवीण मुंढे यांनी पदभार स्वीकारला. कोरोनासह कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न दोघांनी उत्तमरीत्या हाताळला. जिल्हा कोरोनामुक्त झाला आणि दोन्ही अधिकाऱ्यांचे लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी देखील कौतुक केले. गेल्या वर्षी तर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बदली करू नये अशी मागणीच नागरिकांनी ना.गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्याकडे केली होती.
जळगाव जिल्ह्यातील दोन वर्षाचा कार्यकाळ जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी पूर्ण केला असून लवकरच त्यांची बदली होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जळगावचे जिल्हाधिकारी मंत्रालयात एखाद्या पदावर बदली करून घेण्यास इच्छुक असल्याचे समजते. जळगाव जिल्हाधिकारी म्हणून मुंबईचे एक अधिकारी तर पोलीस अधीक्षक म्हणून मूळ बुलढाण्याचे असलेले आणि सध्या मुंबईत नेमणूक असलेले अधिकारी येण्यास इच्छुक आहेत.
राज्यात सध्या सत्ता कुणाची याविषयी न्यायालयीन सुनावणी प्रलंबित आहेत. सध्याच्या शिंदे-भाजप सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश लवकरात लवकर पारित केले तर त्यांच्याच मर्जीतील अधिकाऱ्यांची वर्णी लागणार हे निश्चित आहे.