जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२३ । कोरोना काळात महागाईने जनतेचं जगणं मुश्किल केलं होते. मात्र त्यानंतर यातून दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळाले. परंतु महागाई अजूनही सर्वसामान्यांची पाठ सोडत नाहीय. दर महिन्याला कोणती ना कोणती वस्तू महागतेच आहे. कधी भाजीपाला कधी आवाक्यात असतो तर कधी घामच फोडतो. सध्या गहू, तांदूळ, डाळींच्या दरात ११ ते १५ टक्के वाढ झालेली आहे.
किराणा व भाजीपाला खरेदीत पैशाची बचत करून बाहेर हॉटेलमध्ये जेवणाला जाणाऱ्यांना मात्र महागाईमुळे ब्रेक लागला आहे. घरचेच जेवण महागल्याने बाहेर कुठे जाणार असे सर्वसामान्य नागरिक बोलू लागले आहेत. पावसाचा फटका, डाळ व धान्याची आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे महागाई वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दैनंदिन संसाराचा गाडा हाकताना महागाईची सवय झालेली असते, मात्र काटकसर करून काही नवीन करायचे म्हटले तर ते शक्य होत असल्याचे गृहिणींचे म्हणणे आहे.
जून महिन्यात तूर डाळ १४० रुपये इतकी होती. ती आता १५५ रुपयांवर गेली आहे. तर तांदूळ १५५ वरून १६० रुपयांवर, गहू २८ वरून ३२ रुपयांवर, हरभरा डाळ ६० वरून ७० रुपयांवर गेली आहे. एकंदरीत धान्य व कडधान्याच्या दरात ११ ते १५ टक्के वाढ झालेली आहे.