⁠ 
शनिवार, मे 4, 2024

जळगाव जिल्ह्यात थंडीची चाहूल ; आठ दिवसांत किमान तापमानात मोठी घसरण

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२३ । पावसाळा संपल्यानंतर जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ झाली होती. मागील काही वर्षांच्या तुलनेत ‘ऑक्टोबर हिट’मध्ये तापमानात प्रचंड वाढ झाल्याने उकाड्याने नागरिक चांगलेच हैराण झाले होते. मात्र, आता तापमान वेगाने कमी होत असून जळगावसह अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे.

महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हळूहळू थंडी वाढत असल्याचे चित्र आहे. गत आठ दिवसांमध्ये जळगाव जिल्ह्यात किमान तापमानात तब्बल १६ ते १७ अंशांनी घसरण झाली आहे. गेल्या रविवारी जळगावातील किमान तापमान २८ पर्यंत होते. त्यात घसरण होऊन आता ११.४ अंश सेल्सिअसपर्यंत आल्याने गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे.

पहाटे थंडी, तर दुपारी सुसह्य ऊन असे आल्हाददायक हवामान आहे. ऑक्टोबर हीटचा परिणाम आता ओसरला असून, आल्हाददायक वातावरणामुळे जळगावकर सुखावले आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तापमानात वाढ झाली होती. पितुपक्षात जिल्ह्याचे तापमान ३७ सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. यामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाल्याने जळगावकर चांगलेच त्रस्त झाले होते. मात्र आता गत आठ दिवसांपासून तापमानात घसरण होत असून, थंडी वाढत आहे.

दिवसा उन्हाची तीव्रता कायम असली, तरी रात्री आणि पहाटच्या सुमारास थंडीचा जोर वाढला आहे. जिल्ह्याचा पारासुद्धा घसरला आहे. थंडीचे दिवस जवळ येऊ लागल्याने शहरात ऊबदार कपड्यांची मार्केटमध्ये गर्दी वाढत आहे. आगामी दिवसात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.