⁠ 
शनिवार, मे 4, 2024

एकनाथ शिंदेंवर मोठं संकट : इतर पक्षात विलीनीकरण केल्याशिवाय पर्याय नाही

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२२ । शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास ५० आमदार गेल्या पाच दिवसापासून गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये जाऊन थांबले आहेत. पाच दिवस झाले तरी कोणताही तोडगा निघत नसून शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. नवीन सरकार स्थापनेचा कोणताही मुहूर्त निघत नसल्याने बंडखोरांमध्येच वादविवाद सुरु झाल्याची चर्चा आहे. आता या गटाला धक्का देणारी अजून एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे इतर पक्षात विलीनीकरण केल्या शिवाय पर्याय नाही. यामुळे आता हा गट अजून अडचणीत आला आहे.

आपल्याला शिवसेनेच्या दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. या गटाचे अन्य कोणत्याही मान्यताप्राप्त राजकीय पक्षात विलीनीकरण करण्याशिवाय पर्याय नाही, असे अनंत कळसे म्हणाले आहेत.असे ना केल्यास बंडखोरी करून गेलेले सर्व आमदार हे अपात्र ठरतील. अनंत कळसे यांच्या मते पक्षांतरविरोधी कायदा अतिशय स्पष्ट आहे, तो विभाजन ओळखत नाही. दहाव्या परिशिष्टानुसार, दोन तृतीयांश आमदारांनी हातमिळवणी केली तर त्यांना वेगळा गट स्थापन करता येणार नाही. त्यांना कोणत्याही नोंदणीकृत राजकीय पक्षात विलीन व्हावे लागेल. तसे न केल्यास त्यांना अपात्र ठरवले जाईल

कळसे यांच्या मतांना दुजोरा देताना न्यायमूर्ती कोळसे पाटील म्हणाले, की सुधारित पक्षांतरविरोधी कायद्यानुसार, विभाजनाला कायदेशीर वैधता नाही आणि नवीन गटाला राजकीय पक्षात विलीन व्हावे लागते. वेगळा गट स्थापन करण्याची तरतूद नाही. सध्याच्या परिस्थितीत नवीन सरकारच्या स्थापनेत उपसभापतीची भूमिका महत्त्वाची असेल. उशीर झाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही, राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, असेही कोळसे पाटील म्हणाले.

पक्षांतरविरोधी कायद्यानुसार शिंदे यांच्यासमोर विलीनीकरण हाच एकमेव पर्याय असल्यामुळे विद्यमान सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार संघटना किंवा भाजपा या पक्षात विलीन होण्याचा पर्याय शिंदे यांच्याकडे आहे.असे म्हटले जात आहे. मात्र असे हि म्हटले जात आहे कि, बंड केल्यावर भाजपमध्ये विलीनीकरण करावे लागेल असे यातील बहुतांश बंडखोरांना माहित नव्हते. शिवसेनेच्या नेत्यांना भाजपाशी हातमिळवणी करणे कदाचित सोयीचे नसेल. कारण 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासाठी अडचणी निर्माण होती.