⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

Big Breaking : बंडखोरांना आली जाग, आसाम पूरग्रस्तांना करणार ५१ लाखांची मदत!

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२२ । शिवसेनेतील बंडखोर आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गेल्या आठ दिवसापासून गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले आहेत. आसाममध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून २० लाखांपेक्षा अधिक नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. बंडखोर आमदार हॉटेलमध्ये मज्जा मारताय पण त्यांना आसामच्या जनतेशी काही देणे घेणे राहिले नसल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात होता. शिवसेना वारंवार तोच मुद्दा हेरून टीका करीत होती तर तिकडे गुवाहाटीत देखील काही पक्ष, संघटनांनी बंडखोरांना विरोध दर्शविला होता. अखेर एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले असून शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत ५१ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ३९ तर इतर अपक्ष असे जवळपास ५२ आमदार बंडखोरी करीत शिवसेनेच्या गटात सामील झाले आहेत. मुंबईहून सुरत अहमदाबादमार्गे सर्व आमदार गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये पोहचले आहेत. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये मुक्काम करीत आमदारांना ८ दिवस पूर्ण झाले असून राज्यात सरकार कुणाचे हा तिढा अद्याप सुटलेला नाही. आमदारांना ५० कोटी, २० कोटी दिले आहेत, आमदारांवर काळी जादू करण्यात आली, सरकार बदलासाठी ३ हजार कोटींचा खर्च झाला, हॉटेलच्या खाण्यापिण्याचा एका दिवसाचा खर्च ८ लाख रुपये असल्याचे आरोप बंडखोरांवर करण्यात आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे नाना पटोले यांनी हे आरोप केले होते.

आमदारांवर आरोप होत असतानाच आसाममध्ये सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली असून लाखो नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. नागरिकांना मदतीची आवश्यकता असून आसामचे मुख्यमंत्री यांनी देखील मदतीची मागणी केली आहे. आसामची परिस्थितीत भयानक असताना देखील शिवसेनेचे बंडखोर आमदार त्याठिकाणी मज्जा करीत आहेत. आमदारांच्या नाचगाण्याचे व्हिडीओ व्हायरल होत असून त्यांना आसामच्या जनतेशी काही देणे घेणे नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. बंडखोर आमदारांना वारंवार टीकेला सामोरे जावे लागत होते.

हे देखील वाचा : वेळ येऊ द्या चुना कसा लावायचा संजय राऊतला दाखवतो : गुलाबराव पाटील

एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सकाळी ट्विट केले असून, आसाममधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत ५१ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. शिवसेना बंडखोर आमदार आसामसाठी मदत करणार असल्याचे चित्र सकारात्मक असले तरी ५१ आमदार मिळून ५१ लाखांचीच मदत करीत असल्याने त्यांच्यावर पुन्हा टीका होणार असे बोलले जात आहे.