⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | Big Breaking : अमळनेर डेपोची बस नर्मदा नदीत कोसळली, १२ प्रवासी ठार, १५ जणांना वाचविण्यात यश!

Big Breaking : अमळनेर डेपोची बस नर्मदा नदीत कोसळली, १२ प्रवासी ठार, १५ जणांना वाचविण्यात यश!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२२ । राज्यासह देशभरात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून त्यातच अमळनेर डेपोची बस मध्यप्रदेशातील खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेनजीक पुलावरून नर्मदा नदीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. एएनआय च्या ट्विटनुसार बसमधील १२ जणांना जीव गमवावा लागला असून १५ प्रवाशांना वाचविण्यात यश आला आहे. बसमध्ये सुमारे ४० प्रवासी असल्याची माहिती आहे. परतीच्या पावसात बस इंदौरहून पुणे जाण्यासाठी निघाल्यानंतर हा अपघात झाला आहे.

अमळनेर डेपोची बस अमळनेर ते इंदूर या मार्गावर बससेवा आहे. अमळनेर डेपोची बस क्रमांक एमएच.४०.एन.९८४८ बस ही इंदूर येथे गेली होती. तेथून परतीच्या प्रवासासाठी बस अमळनेरच्या दिशेने सकाळी ७.३० वाजता निघाली होती. खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणार्‍या कलघाट गावाजवळ संजय पुलावरून सकाळी १० वाजेच्या सुमारास नर्मदा नदीच्या पात्रात ही बस कोसळली. यात सुमारे ४० प्रवासी असून यातील काही प्रवासी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, एस.टी. खात्याचे जळगाव जिल्हा विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी या अपघाताला दुजोरा दिला आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार अपघातात १२ प्रवाशांना जीव गमवावा लागला असून १५ प्रवाशांना वाचविण्यात यश आले आहे. मध्यप्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली आहे. भीषण अपघातानंतर परिसरातील जनतेसह पोलीस प्रशासनाने धाव घेऊन रेस्न्यू ऑपरेशन सुरू केले आहे. अपघातग्रस्त बस क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली असून मृतांचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही.

दरम्यान, जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी याबाबत आढावा घेतला असून प्रसिद्धी पत्रक देखील जारी केले आहे. घटनास्थळी प्रशासन पोहचले असून जखमींवर उपचार सुरु आहेत. जळगाव जिल्हा प्रशासन देखील खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून अपघातग्रस्त व्यक्तींना सर्व आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे. घटनास्थळी मदतीसाठी 09555899091 हा तर जळगाव जिल्हाधिकारी नियंत्रण कक्षाचे 0257-2223180, 0257-2217193 हे दोन क्रमांक देण्यात आले आहेत.

अमळनेर आगाराच्या या बसवर चंद्रकांत एकनाथ पाटील (चालक क्र. १८६०३) व वाहक प्रकाश श्रावण चौधरी (८७५५) हे होते. परंतु, त्‍यांच्‍याशी अद्याप संपर्क झालेला नाही. तर या भीषण अपघातानंतर परिसरातील जनतेसह पोलीस प्रशासनाने धाव घेऊन रेस्न्यू ऑपरेशन सुरू केले आहे. सदर अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केला आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.