भुसावळचे अनिल चौधरी बच्चू कडूंसोबत गुवाहाटीत दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । राज्यात गेल्या दोन दिवसापासून मोठ्या घडामोडी घडत असून शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ShivSena News) यांनी मोठा गट फोडला असून जवळपास ४० आमदारांना घेऊन ते गुवाहाटीला जाऊन बसले आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करीत महाविकास आघाडीतून बाहेर पडा असे शिंदे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारीच वर्षा बंगला सोडला असून ते मातोश्रीवर परतले आहे. शिवसैनिक आणि नाराजांनी समोर येऊन सांगितले तर मी राजीनामा देतो असेही मुख्यमंत्री म्हणाले. उद्धव ठाकरे गटातील एक-एक आमदार फुटत असून आता प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी देखील बच्चू कडूंसोबत गुवाहाटीत दाखल झाले आहे. अनिल चौधरी यांचा पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्या सोबतचा फोटो देखील वायरल झाला आहे. (Anil Chaudhari in Guwahati)

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज असल्याचे वृत्त माध्यमातून झळकत होते. नगरविकास खात्यात आणि एकनाथ शिंदे यांच्या कामात होत असलेल्या ढवळाढवळला ते कंटाळले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील त्यांनी याबाबत बोलून दाखविले होते. पक्षप्रमुख मनावर घेत नसल्याने एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४० आमदार आणि मंत्र्यांचा मोठा गट फोडत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादात सध्या त्यांच्याकडे ४६ आमदार असल्याचे सांगितले होते. शिंदे यांना वेगळा गट स्थापन करण्यासाठी ३६ आमदारांची आवश्यकता आहे.

एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करीत आघाडीतून बाहेर पडा असे ट्विट केले होते. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्ह येत जनतेशी संवाद साधला. मला माझ्या लोकांनी सांगितले असते की, तुम्ही मला मुख्यमंत्री म्हणून नको, तुम्ही नालायक आहेत तर मी या क्षणाला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईन. अशी भावनिक साध उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना घातली. याच बरोबर ते शिवसैनिकांना देखील भावनिक साद घालत म्हणाले कि, जर तुम्हाला पक्षप्रमुख नको असे वाटत असेल तर स्पष्टपणे सांगा मी त्याचाही राजीनामा देतो, मुख्यमंत्री यांनी सांगितले होते.

गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडीत शिवसेनेतील आणि अपक्ष आमदार एक-एक करून बाहेर पडत असून एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन सामील होत आहे. राज्याचे मुलुख मैदान तोफ आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह बुधवारी गुवाहाटीला जाऊन पोहचले होते. ढाण्या वाघ गेल्याने शिवसेनेला मोठे खिंडार पडले होते. शिवसेना गुलाबराव पाटलांचा धक्का पचवू शकले नाही तोच शिवसेनेचे माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यासह आशिष जैस्वाल, सदा सरवणकर, मंगेश कुडाळ हे देखील गुवाहाटीला पोहचले आहे.

दरम्यान, प्रहार संघाचे अध्यक्ष बच्चू कडू हे देखील गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसून आले होते. बच्चू कडू यांच्या पाठोपाठ प्रहार भुसावळचे अनिल चौधरी देखील दाखल झाले आहे. तसेच गुवाहाटीत दाखल असलेल्या आमदारांसाठी गुवाहाटीच्या हॉटेलात टूथ ब्रशपासून कपड्यांपर्यंत सर्व व्यवस्था केली आहे. बाहेर जाण्यास मात्र कोणालाही परवानगी नाही. प्रत्येक आमदार व सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांना हॉटेलात स्वतंत्र रुम दिल्या आहेत. त्या ठिकाणी गरजेच्या सर्व वस्तू आहेत. कोणत्याही आमदारांवर जबरदस्ती नाही, अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी सूत्रांना दिली आहे.