जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ रेल्वे विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील डिसेंबर २०२५ महिन्यात उल्लेखनीय आर्थिक कामगिरी नोंदवली असून, विविध उत्पन्न स्रोतांमधून एकूण १५२.९५ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. ही रक्कम डिसेंबर २०२४ च्या तुलनेत सुमारे २३ टक्क्यांनी जास्त आहे. विभागातील कर्मचाऱ्यांची अधिकारी व नियोजनबद्ध कार्यपद्धती, कार्यक्षम व्यवस्थापन आणि संघ भावनेमुळे महसुलात वाढ शक्य झाल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

भुसावळ विभागाने डिसेंबरमध्ये प्रवासी उत्पन्नातून ७९.७६ कोटी महसूल मिळवला. विभागाला इतर कोचिंग उत्पन्नातून ६ कोटी ४४ लाख, पेट्रोलियम पदार्थ, कांदा, अन्नधान्य, सिमेंट, ऑटोमोबाइल एनएमजी आदी विविध माल वाहतुकीतून ६४ कोटी ५१ लाख महसूल प्राप्त झाला.

तसेच विविध शुल्क व सेवांतून २ कोटी २४ लाख उत्पन्न मिळाले. दरम्यान, डिसेंबर २०२५ मध्ये राबवण्यात आलेल्या सखोल तिकीट तपासणी मोहिमेत ६० हजार ६७० विनातिकीट व नियमबाह्य प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून ४ कोटी ५८ लाखाचा दंड वसूल झाला. त्यात डिसेंबर २०२४ मधील ४ कोटी ५ लाखांच्या तुलनेत सुमारे १३ टक्के वाढ नोंदवण्यात आली.

भुसावळ रेल्वे विभाग प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित, आधुनिक व सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करतो आहे. तसेच स्वच्छता अभियान, प्रवासी सुविधांचा विस्तार आणि तांत्रिक सुधारणा यासारखे उपक्रम राबवण्यात येता आहे. प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.








