जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२३ । रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भुसावळ-पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस आजपासून (शनिवार) पुढील दोन महिने रद्द करण्यात आली आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने प्रसिध्दीपत्राद्रवारे माहिती दिली असून त्यामुळे खान्देशातील प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
यामुळे रद्द?
कर्जत रेल्वे स्थानकात रेल्वे रिमॉडेलींगच्या काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे २८ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान 11025 आणि 11026 क्रमांकाची भुसावळ-पुणे-हुतात्मा एक्सप्रेस दोन महिने बंद राहणार असल्याचे रेल्वेने नमूद केले आहे. अर्थात, दोन महिन्यांपर्यंत प्रवाशांची गैरसोय होणार आहे. तर, या कालावधीत किमान पनवेलपर्यंत जाणारी तात्पुरती एक्सप्रेस सुरू करण्यात यावी अशी मागणी आता करण्यात येत आहे.
पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस ही भुसावळसह जळगाव, पाचोरा आणि चाळीसगाव स्थानकांवरून कल्याणमार्गे पुणे येथे जाण्यासाठी अतिशय महत्वाची गाडी आहे. या ट्रेनमुळे जिल्ह्यातील हजारो प्रवाशांची सुविधा होत असते. मात्र आजपासून तब्बल दोन महिन्यापर्यंत ही रेल्वे गाडी बंद राहणार असल्याची घोषणा रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आलेली आहे.