शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली भुसावळच्या वकिलाला लावला २१ लाखांचा चुना

नोव्हेंबर 20, 2025 12:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । शेअर्स ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून भुसावळच्या एका वकिलाला सायबर ठगांनी तब्बल २१ लाख ५२ हजार ३६३ रुपयांचा चुना लावला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यामध्ये मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

fraud jpg webp

भुसावळ येथील विवेक चिंतामण पाटील हे व्यवसायाने वकील आहेत. १ ऑक्टोबर २०२५ रोजी अॅड. पाटील यांना फेसबुकवर इंटरनॅशनल डिगेस्ट या नावाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या गुंतवणुकीसंबंधीची एक जाहिरात दिसली. या जाहिरातीवर क्लिक केल्यावर ते ट्रेडग्रीप या लिंकवर पोहोचले. याच दरम्यान त्यांना टेलिग्रामच्या ट्रेडग्रीप अकाउंटवरून पोर्टफोलिओ मॅनेजर अभय आणि सीनियर मॅनेजर नोमान यांनी संपर्क साधला.

Advertisements

त्यांनी गोल्डमध्ये गुंतवणूक केल्यास त्याचे दाम दुप्पट डॉलरमधून परत मिळतील, असे खोटे आश्वासन दिले. यावर विश्वास ठेवून अॅड. पाटील यांनी सुरुवातीला १९ हजार १६३ रुपये भरले आणि त्यानंतर १ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत अॅड. पाटील यांनी एकूण २१ लाख ५२ हजार ३६३ रुपये गुंतवले. त्यांना त्यांच्या प्रोफाइलवर ३१ लाख ६८ हजार रुपयांचा नफा झाल्याचे दिसत होते.

Advertisements

हा नफा बँकेत ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना तो करता आला नाही. त्यानंतर अभय आणि नोमान यांनी पैसे परत देण्यास नकार दिला. तसेच पैशांची मागणी केल्यास खाते दुसऱ्या व्यक्तीला विकून टाकण्याची धमकी दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अॅड. पाटील यांनी १८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now