जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२६ । जळगाव जिल्ह्यातून आणखी एक नवीन प्रस्तावित मार्ग बनणार असून ज्यामुळे राजस्थानमधील अजमेर प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. भुसावळ–चित्तोडगड (३४७ सी) दरम्यान नवीन प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग बनणार आहे. या मार्गाच्या उभारणीमुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील कृषी व औद्योगिक सामग्रीच्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.

जळगाव जिल्ह्यातून आधीच पाच महामार्ग जाणार असून यामध्ये एनएच ५३ सुरत (गुजरात) ते पारादीप (ओडिशा), एनएच ७५३ एफ जळगाव ते दिगी पोर्ट, एनएच ७५३ जे जळगाव ते मनमाड, एनएच ७५३ एल इंदूर–हैदराबाद, एनएच ७५३ बी बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर महामार्गाचा समावेश आहे. त्यामध्ये आता भुसावळ–चित्तोडगड दरम्यान नवीन प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाची भर पडणार आहे.

असा असणार मार्ग?
भुसावळ–चित्तोडगड महामार्ग हा भुसावळ, पाल, खरगोन, धार, रतलाम, मंदसौर, नीमच, चित्तोडगड असा असणार आहे. भीलवाडामार्गे पुढे पुष्कर आणि अजमेरला देखील तो जोडला जाणार आहे.

सद्यःस्थितीत भुसावळहून चित्तोडगड जाण्यासाठी बऱ्हाणपूर, इंदूर, नागदा, जावरा मार्गे तसेच यावल, चोपडा, शिरपूर, सेंधवा, रतलाम मार्गे जाणारे दोन स्वतंत्र महामार्ग उपलब्ध आहेत. पैकी बऱ्हाणपुरमार्गे चित्तोडगड जाण्यासाठी सुमारे ६०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचा प्रवास करावा लागतो. दुसरीकडे चोपडा, शिरपुर, सेंधवामार्गे चित्तोडगड जाण्यासाठीही जवळपास तितकेच अंतर कापावे लागते.
मात्र, पालसह बिस्तन, खरगोन, धारमार्गे नवीन महामार्ग तयार झाल्यावर भुसावळहून चित्तोडगड पर्यायाने पुष्कार आणि अजमेर बरेच जवळ येईल. या महामार्गामुळे जळगाव ते अजमनेर पर्यंतच्या प्रवासाचा वेळ अंदाज १३ ते १४ तासावरून ८ ते ९ तासापर्यंत कमी होऊ शकतो.
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात साधारण ३६ किलोमीटर आणि मध्य प्रदेशातील २०१ किलोमीटर अंतर मिळून तयार होणाऱ्या या महामार्गामुळे भुसावळ–चित्तोडगड दरम्यानचे अंतर साधारणपणे १५० किलोमीटरने कमी होण्याचा अंदाज आहे . भुसावळ–चित्तोडगड राष्ट्रीय महामार्ग आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक विकासाचा कणा ठरणार आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमधील परस्पर संपर्क अधिक मजबूत होऊन दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागांचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता या महामार्गात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये या प्रकल्पाबाबत मोठ्या अपेक्षा आणि आशा व्यक्त केल्या जात आहेत.





