जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२१ । राज्यभर गाजलेल्या बीएचआर पतसंस्था गैरव्यवहारातील मास्टर माईंड मुख्य संशयित सुनील झंवरचा अटकपूर्व जामीन अर्ज शनिवारी पुणे न्यायालयाने फेटाळला. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून झंवर याने काेर्टात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. सरकारपक्षातर्फे अॅड.प्रवीण चव्हाण यांनी काम पाहिले.
याबाबत असे की, संतोष काशिनाथ कांबळे (वय ५७, रा. लोहगाव, पुणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांचे वडील काशिनाथ कांबळे हे सन १९९०मध्ये शिक्षक पदावरून निवृत्त झाले आहेत. सन २०१४ मध्ये कांबळे कुटंुबीयांनी बीएचआर पतसंस्थेची आकर्षक व्याज देणारी जाहिरात माध्यमांतून पाहिली होती. उत्पन्न कमी असल्याने वडिलांसोबत चर्चा करून त्यांनी जवळ असलेला पैसा बीएचआर पतसंस्थेत ठेवून त्यातून येणाऱ्या व्याजावर घरखर्च करण्याची बोलणी केली.
त्यानुसार काशिनाथ कांबळे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी या दोघांनी पुण्यातील बीएचआरच्या भीमा कोरेगाव व शिक्रापूर या दोन्ही शाखांमध्ये विविध योजनांतर्गत वर्षभरासाठी पैसे ठेवले. नंतर पुन्हा मुदत वाढवली. त्यांच्या ठेवींच्या बदल्यात दोन्ही शाखांनी मिळून १८ लाख ७ हजार १५९ रुपये त्यांना देय होते; परंतु मुदत संपल्यानंतरही कांबळे यांना पैसे परत मिळाले नव्हते. याप्रकरणी गुन्हा दाखल असून, त्यात सुनील झंवरसह इतर संशयित आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून झंवर याने काेर्टात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. सरकारपक्षातर्फे अॅड.प्रवीण चव्हाण यांनी काम पाहिले.