⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | गुन्हे | Big Breaking : बीएचआर खंडणी गुन्ह्याच्या तपासासाठी ‘एसआयटी’, यांचा आहे समावेश

Big Breaking : बीएचआर खंडणी गुन्ह्याच्या तपासासाठी ‘एसआयटी’, यांचा आहे समावेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२३। बीएचआर पतसंस्थाप्रकरणी दाखल गुन्ह्यात मदतीसाठी खंडणी मागितल्याप्रकरणी तत्कालीन सरकारी वकील ऍड.प्रवीण चव्हाण यांच्यासह तिघांविरुद्ध चाळीसगाव पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी विशेष तपास पथकाचे गठण केले आहे. या पथकात दोन अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

बीएचआर पतसंस्था अफरातफर प्रकरणी दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी खंडणी मागितल्याने सूरज सुनील झंवर (३२, रा. साई बंगला, सुहास कॉलनी, जळगाव) यांनी याबाबत डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये १ कोटी २० लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार सुरुवातीला डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात ऍड. प्रवीण पंडित चव्हाण (रा. सुमंगल अपार्टमेंट, मोदीबाग, शिवाजीनगर, पुणे), शेखर मधुकर सोनाळकर (रा. नयनतारा अपार्टमेंट जळगाव), उदय नानाभाऊ पवार (रा. चाळीसगाव) हे संशयित आरोपी आहेत. त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम १६६ २१३, ३८४, ३८५, ३८६, ३८८, ५०६, ३४, १२० ब अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

खंडणीची रक्कम चाळीसगाव येथे देण्यात आल्याने हा गुन्हा पुण्यातून जळगाव पोलिसांकडे वर्ग झाला. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेमार्फत करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथकाचे (एसआयटी) गठण करण्यात आले आहे. या पथकात पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, दोन हवालदार व पोलीस नाईकांचा समावेश आहे.

विशेष तपास पथकात पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक दीपक जगदाळे, हे. कॉ. विजय पाटील, नरेंद्र वारुळे, पोलीस नाईक नाईक जीवन पाटील व मनोज सुरवाडे यांचा समावेश आहे. या सहा जणांच्या पथकाकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येणार आहे.

पथकाने गेल्या आठवड्यात फिर्यादीचे वडील सुनील झंवर यांना एक पत्र दिले. जबाब नोंदविण्याकामी हजर राहण्याविषयी पत्राद्वारे कळविण्यात आले. त्यानुसार दि. १ फेब्रुवारी रोजी झंवर यांचा जबाब एसआयटी पथकाने नोंदविला आहे. तसेच झंवर यांच्याकडून काही पुराव्यांसह दस्तऐवजही एसआयटीने ताब्यात घेतले आहेत. गुन्ह्यातील फिर्यादीचा फेर जबाब नोंदविण्यासाठी देखील बोलाविण्यात आले असून २-३ दिवसात तो नोंदविला जाणार आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.