बियर बार, वाईन शॉप बंदला १०० टक्के प्रतिसाद, पोलीस अधीक्षकांना निवेदन
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२१ । जिल्ह्यात अवैध ढाबे, किरकोळ हॉटेल व्यवसाय मोठया प्रमाणात वाढत असून कुठलाही परवाना न घेता त्याठिकाणी अवैधरित्या दारु विक्री व दारुप्राशन केले जाते. हे सर्व प्रकार थांबवावे अशी मागणी करीत वरणगाव येथे परवानाधारक विक्रेते ज्ञानदेव हरी झोपे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करीत संबंधितांवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंट असोसिएशनतर्फे उत्पादन शुल्क अधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.
डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंट असो.ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हयात मोठ्या प्रमाणात बनावट दारुची विक्री होते. हा महिन्याकाठी काही कोटी रुपयांचा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. असे रॅकेट जिल्हयात कार्यरत आहे. जिल्हयातील ग्रामीण भागातील ढाब्यावर अवैध दारु विक्री करणाऱ्या मालकावर आणि जागा मालकावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
वरणगावला २० सप्टेंबरला परवानाधारक मद्य विक्रेते ज्ञानदेव हरी झोपे यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्यांना गंभीररित्या जखमी करण्यात आले. त्यांची स्थिती गंभीर आहे. ते असोसिएशनचे सदस्य आहेत. शासनाला महसूल मिळवून देण्यात आम्ही नेहमीच आघाडीवर राहत असलो तरी अनेक संकटांचा सामना करावा लागतो. याची प्रशासनाने दखल घेवून आम्हाला संरक्षण द्यावे असेही म्हटले आहे.
या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला आज दि.२५ जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत संप पुकारणार असल्याचे जळगाव डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंट असोसिएशनचेचे अध्यक्ष ऍड.रोहन बाहेती व सचिव पंकज जंगले यांनी म्हटले आहे. बंद यशस्वी करण्यासाठी असोसिएशनसह सेल्स टीमने परिश्रम घेतले.