जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२४ । जळगाव जिल्ह्यात यंदा तापमानाचा कहर पाहायला मिळाला असून तापमान वाढीसह जिल्ह्यातील धरणांमध्ये मोठी कपात झाली आहे. जिल्ह्यातील मोठ्या सिंचन प्रकल्पात गेल्या महिन्याभरात मोठी घट झाली असून या प्रकल्पांमध्ये जेमतेम २८ ते ३० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.गेल्या वर्षाच्या तुलनेत हा पाणीसाठा दहा टक्क्यांनी कमी झाल्याचे सांगितले जाते.

अजूनही पावसाळा सुरू होण्यास उशीर असल्यामुळे आणि सुरुवातीचा साधारण पाऊस पडल्यानंतर पाणीसाठा वाढण्याची शक्यता कमीच असल्याने मोठा पाऊस झाल्यावर या प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढण्यास मदत होईल.
गेल्या मे महिन्यात जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४५ अंशावर गेला होता. यामुळे प्रचंड उष्णता जाणवली. तापमान वाढीचा परिणाम धरणातील जलसाठ्यावर दिसून आला. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये जेमतेम २८ ते ३० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षाशी तुलना करता हा साठा दहा टक्क्यांनी कमी आहे. तापी नदीवरील हतनुर धरणात सद्यस्थितीला २९ टक्के तर गिरणा धरणात १२.६० टक्के पाणीसाठा आहे.
वाघूर धरणामध्ये ५९ टक्के पाणीसाठा शिल्लक असला तरी गेल्या वर्षाची तुलना करता या तारखेला हातनूर मध्ये ४५ टक्के गिरणा मध्ये २४ टक्के तर वाघूर मध्ये ६४.४७ टक्के पाणीसाठा होता. जिल्ह्यातील अभोरा ,मंगरूळ, सुकी, मोर, गुळ, बहूळा, बोरी, भोकरबारी, तोंडापूर, अग्नावती, अंजनी, मन्याड व शेळगाव बॅरेज मधील एकूण पाणीसाठयाची क्षमता ३१४. २५ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. मात्र तापमान वाढीचे संकट ओढवल्याने आणि कमी पावसाळे होत असल्याने सिंचन प्रकल्पामध्ये जेमतेम २८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
मध्यम प्रकल्पाची अवस्था तळ गाठू लागली असून त्यात जेमतेम १५.६६ टक्के पाणीसाठा सद्यस्थितीत आहे. अलीकडे मार्च एप्रिल पासूनच धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागतो तो मे मध्ये उन्हाच्या तडाख्याने फारच खालावतो. चोपडा तालुक्यातील गुल मध्यम प्रकल्प व शेळगाव प्रकल्पात,मोर ,सुकी,आभोना,मंगरूळ हे प्रकल्प वगळता जवळपास सर्व प्रकल्पात पाणीसाठ्याची स्थिती जेमतेम झाली आहे.