जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२३ । बंदी असलेल्या प्लास्टीक कॅरीबॅगबाबत जळगाव महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली असून या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी विठ्ठल पेठ व का.ऊ.शाळेजवळून पाच क्विंटल कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या असून किशोर एकनाथ पाटील (रा.विठ्ठल पेठ, जळगांव) व राहूल सिंग (रा.का.ऊ.कोल्हे शाळा परिसर) या दोघांना प्रत्येकी पाच हजाराचा दंड आकारण्यात आला आहे.
महापालिकेच्या आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त उदय पाटील यांच्या पथकातील मुख्य स्वच्छता निरीक्षक उल्हास इंगळे, जितेंद्र किरंगे, नागेश लोखंडे, रमेश इंगळे, मुकादम दिपक भावसार, वालीदास सोनवणे व शरद पाटील यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत मोहीम राबविली. त्यात किशोर पाटील व राहूल सिंग या दोघांकडे बंदी असलेल्या प्लास्टीक कॅरीबॅगचा साठा आढळून आला. या कॅरीबॅग जप्त करण्यासह दोघांकडून जागेवरच दहा हजाराचा दंड वसूल करण्यात आला.
प्लास्टीक कॅरी बॅग आढळली तर असा होतो दंड
महाराष्ट्रात प्लास्टीक कॅरी बॅग उत्पादनासह विक्रीला बंदी आहे. महाराष्ट्र प्लास्टीक पिशव्यांचे (कॅरी बॅग) (उत्पादन व वापर) नियम २००६ चे कलम ८ अन्वये उत्पादनाच्या ठिकाणी कॅरी बॅग आढळल्या तर २५ हजार रुपये, होलसेल विक्रेत्यांना ५ हजार तर किरकोळ विक्रेते तसेच ग्राहकांच्या हातात कॅरी बॅग आढळली तर पाचशे रुपये दंड आकारला जातो.