⁠ 
शनिवार, सप्टेंबर 14, 2024
Home | बातम्या | भूतकाळातील कटू आठवणी : बांगलादेशातील हिंसाचारामुळे बांगलादेशी हिंदूंच्या जखमेवरची खपली निघाली

भूतकाळातील कटू आठवणी : बांगलादेशातील हिंसाचारामुळे बांगलादेशी हिंदूंच्या जखमेवरची खपली निघाली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२४ । भारताच्या स्वातंत्र्यापासून, बांगलादेशातील सामाजिक-राजकीय वातावरणाचे पडसाद अनेकदा सीमेपलीकडे उमटले आहेत. याचा मोठा परिणाम शेजारील पश्चिम बंगाल राज्यावर झाला आहे. फाळणीच्या काळात झालेल्या हिंसाचारादरम्यान बांगलादेशातून लाखो लोक विस्थापित झाले, ज्यांनी भारतात पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम आणि मेघालय आदी राज्यांमध्ये आश्रय घेतला. अनेकजण त्यांचे जीवन पुन्हा उभारण्याच्या आशेने बांगलादेशात परतले परंतु त्यांना “निर्वासित” असे कायमचे लेबल लागले. अनेक दशकांनंतर, बांगलादेशला पुन्हा अशांततेचा सामना करावा लागत असून तेथील अल्पसंख्याक समुदाय असुरक्षिततेने ग्रासला आहे. या काळात बंगाली हिंदूंच्या कटू आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. खपली निघाल्यावर जसे भळभळ रक्त वाहायला लागते अगदी तशाच मनाच्या खोल तळाशी दाबून ठेवलेल्या जुन्या आठवणी जागृत होऊन त्या सर्व कटू स्मृतींचा जणू एखादा चलत-चित्रपटच डोळ्यांसमोर सुरू होतो तसाच काहीसा अनुभव बहुतांश बांगलादेशी हिंदूं घेत आहेत.

वन इंडियाने भूतकाळातील अत्याचारांचे साक्षीदार असलेल्या अनेक बंगाली हिंदूंशी संवाद साधून बांगलादेशातील अल्पसंख्याकांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे भीषण वास्तव मांडले आहे.

1971 मध्ये स्वत:चा जीव वाचविण्यासाठी भारतात पळून गेलेल्या सुशील गंगोपाध्याय यांनी बांगलादेशातील नोआखली जिल्ह्यातील त्यांच्या समृद्ध जीवनाची आठवण करून दिली. ते म्हणाले की, “आमचे एक मोठे आणि प्रतिष्ठित कुटुंब होते. आम्ही तिथले जमीनादार होतो. पण मुक्ति युद्धादरम्यान, पाकिस्तानी सैन्य आणि रझाकारांनी आमच्यावर हल्ला केला. घरे जाळली आणि अनेकांना क्रूरपणे ठार मारल्याचे त्यांनी पाणवलेल्या डोळ्यांनी सांगितले. स्वातंत्र्यानंतर पुन्हा मायदेशी म्हणजे बांगलादेशात परतल्यानंतर, तेथील बहुसंख्य समुदायाच्या सततच्या त्रासामुळे त्यांना भारतात कायमचा आश्रय घेण्यास भाग पाडले आहे. पुढे बोलतांना सुशील म्हणाले की, “बांगलादेशातील अलीकडील घटना पाहून हृदय हेलावणारे आहे. मी गर्भवती महिलेच्या पोटात लाथ मारल्याचे फुटेज पाहिले आहे. इतकी क्रूरता अकल्पनीय आहे. १९७१ च्या स्वातंत्र युध्दादरम्यान रझाकारांनी आमच्यावर अत्याचार केले, पुरुषांचे मृतदेह नदीत फेकले आणि पाकिस्तानी सैन्याने आमच्या आया-बहिणींवर अत्याचार केला. इतक्या वर्षांनंतरही त्या जखमा कायम आहेत.” किमान यावेळी तरी आमच्या तेथील हिंदूं बांधवांना वाचवा, अशी मी भारत सरकारकडे हात जोडून मागणी करतो.

आणखी एक मार्मिक कथा बनगावच्या अनिमा दासची आहे, जी बांगलादेशातून पळून गेली तेव्हा गर्भवती होती. त्या त्रासदायक दिवसांची आठवण करून देताना त्या म्हणाल्या, “माझा मुलगा तरुण होता, आणि माझी मुलगी माझ्या पोटात होती. देश संघर्षात बुडाला होता; घरे जाळली गेली होती. भीतीपोटी माझ्या सासरच्यांनी आम्हाला भारतात पाठवले.” वातावरण शांत झाल्यानंतर मी बांगलादेशात परतले पण तिथे पुन्हा राहण्याचा विचारच मला सहन झाला नाही, असे सांगतांना त्यांचा हुंदका दाटून आला.

सीमावर्ती भागातील अनेकांनी अशाच भावना व्यक्त केल्या. अनेकांनी आपली वडिलोपार्जित घरे आणि आठवणी सोडून धार्मिक छळातून पळ काढला होता. विस्थापनाची मूळ वेदना असली तरी, भारताने ऑफर केलेल्या सुरक्षिततेबद्दल सर्वांची कृतज्ञतेची भावना देखील आहे.

वन इंडियाशी बोलताना, हरधन बिस्वास, ज्यांचे वडील बांगलादेशातून स्थलांतरित झाले आहेत. ते म्हणाले की, बांगलादेशातील बहुसंख्यकांनी छळ व अत्याचाराची हिंदू समुदायाला सतत भीती दाखवली आहे, अनेकांना त्यांच्या मायदेशातून पळून जाऊन भारतात आश्रय घेण्यास भाग पाडले आहे.. तरीही, अनेकांनी स्वत:च्या देशात म्हणजे, बांगलादेशात राहणे निवडले, मात्र त्यानंतरही त्यांच्या समोरिल अडचणी कमी झाल्या नाहीत. त्यांना दररोज भीतीच्या सावटाखालीच वावरावे लागते.

1956 मध्ये भारतात आलेल्या परेश दास यांनी एक त्रासदायक अनुभव सांगितला. “माझ्या आजोबांना माझ्या डोळ्यांसमोर बेदम मारहाण करण्यात आली. घाबरून आम्ही आमची जमीन सोडून दिली. त्यांनी माझ्या समोरच माझ्या चुलत भावाला मारहाण केली. आम्ही आता भारतात शांततेत राहत असलो तरी, नोआखलीतील नातेवाईकांना अजूनही धमक्यांचा सामना करावा लागतो. महिन्याभरापूर्वी जमिनीच्या वादातून माझ्या मामाची हत्या झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

रशोमोय बिस्वास यांनी 1971 नंतरच्या छळांची आठवण केली. “हिंदू असणे हा गुन्हा होता. स्वातंत्र्यानंतरही दिलासा मिळाला नाही. पाकिस्तानी लष्कर आणि जमातच्या सैन्याने आम्हाला लक्ष्य केले, हिंदूंच्या घरांवर हल्ले केले.” असे रशोमोय बिस्वास म्हणाले. ”माझ्या कुटुंबाने अनेक रात्री लपून काढल्या, अनेकदा अन्न पाण्याविनाच स्वत:ला जीवंत ठेवले. आम्ही आता भारतात शांततेत राहत असताना, आमचे बरेच नातेवाईक बांगलादेशात राहतात. तेथील हिंदू निर्भयपणे जगू शकतील याची खात्री करून आम्ही भारत सरकारला हस्तक्षेप करण्याची विनंती करतो.” अशी मागणीही त्यांनी केली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.