⁠ 
बुधवार, डिसेंबर 4, 2024
Home | गुन्हे | Yawal : माथेफिरूने 1800 केळीचे खोड कापून फेकले; शेतकऱ्याचे 5 लाख 94 हजाराचे नुकसान

Yawal : माथेफिरूने 1800 केळीचे खोड कापून फेकले; शेतकऱ्याचे 5 लाख 94 हजाराचे नुकसान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२४ । यावल तालुक्यातील अट्रावल या गावातील शेतकऱ्याच्या राजोरा रस्त्यावरील शेतात कुणीतरी अज्ञात माथेफिरूने प्रवेश केला आणि कापणीयोग्य केळी घडाचे नुकसान केले. उभ्या घडावर कोयत्याच्या माध्यमातून केळी कापून फेकण्यात आली. यात १ हजार ८०० केळीचे खोड कापून फेकले आहे. यामध्ये शेतकऱ्याचे तब्बल ५ लाख ९४ हजाराचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अट्रावल (ता. यावल) या गावातील शेतकरी मयूर सुरेश वारके यांनी अट्रावल शिवारातील राजोरा रस्त्यावरील शेतात तब्बल ४ हजार ८०० केळी खोडं लागवड केली असून, आता केळी कापणीयोग्य झाली होती. तर त्यातील २३० खोड केळी त्यांनी कापणी केली होती. ज्याला १ हजार ४०० रुपये क्विंटलचा भाव मिळाला होता. दरम्यान उर्वरित १ हजार ८०० केळीचे खोड हे कापणी योग्य झाले होते व येत्या दोन दिवसात ती कापणी होणार होती.

मात्र, तत्पूर्वीच शुक्रवारी मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात माथेफिरूने कोयत्याच्या साह्याने केळी घडावर सतत वार करून केळीची नासधूस करून तब्बल ५ लाख ९४ हजार रुपयांचे नुकसान केले. हा प्रकार शनिवारी सकाळी निदर्शनास आल्यानंतर यावल पोलिस ठाण्यात मयूर वारके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी करीत आहे.

चार वर्षात चौथी घटना
अट्रावल या गावात सन २०२१ मध्ये अशोक तुकाराम बाउस्कर यांच्या शेतातील केळीचे नुकसान झाले. त्यानंतर ४ मार्च २०२२ मध्ये राजेंद्र प्रभाकर चौधरी यांच्या शेतात तर सन २०२३ मध्ये राजेंद्र व्यंकट चौधरी यांच्या आणि आता मयुर वारके यांच्या शेतात अशा प्रकारे चार वर्षात ही चौथी घटना आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.